अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बुधवारी बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
By विश्वास पाटील | Updated: May 17, 2025 16:09 IST2025-05-17T16:08:35+5:302025-05-17T16:09:33+5:30
प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज

अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बुधवारी बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
कोल्हापूर: अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत बुधवारी (दि.२१) राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी ३ वाजता बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जल तज्ञांनी काढला आहे. या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पुरबाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावे लागते. परिणामी दीड ते दोन महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून कोट्यवधीचे नुकसान या महापुरामुळे झाले आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पुरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.
या प्रश्नी राज्य शासन अलमट्टी धरणाच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे. पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगानेच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत. जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.