कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गप्रश्नी आठवड्यात बैठक; नितीन गडकरी यांचे संसदेत आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:11 IST2025-12-05T15:10:42+5:302025-12-05T15:11:45+5:30
वर्षात काम पूर्ण करण्याचे मंत्र्यांनी दिले आश्वासन

कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गप्रश्नी आठवड्यात बैठक; नितीन गडकरी यांचे संसदेत आश्वासन
कोल्हापूर : सातारा ते कोल्हापूरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी आल्याने विलंब होत आहे. पुढच्या आठवड्यात यासंबंधी बैठक घेऊन कामाला गती दिली जाईल. पुढील एक वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी संसदेच्या अधिवेशनात पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असल्याकडे लक्ष वेधले. याला उत्तर देताना मंत्री गडकरी यांनी हे आश्वासन दिले.
खासदार सुळे प्रश्न विचारताना म्हणाल्या, पुणे ते कोल्हापूर महामार्गाच्या कामास ठेकेदारांच्या अडचणीमुळे विलंब होत आहे. काही ठेकेदारांना ब्लॅक लिस्टही केले आहे. दरम्यान, या महामार्गावर अपघाताच्या घटना वाढत आहेत. अपघात कमी करण्यासाठी केेंद्राकडून पथक आले होते. त्यांनी सुचविलेल्या काही उपाययोजना केल्याने अपघाताच्या घटना कमी झाल्या आहेत; पण अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे?
याला उत्तर देताना मंत्री गडकरी म्हणाले, पुणे ते कोल्हापूर महत्त्वाचा महामार्ग आहे. यातील पुणे ते सातारा महामार्गाचे काम पहिल्यांदा रिलायन्स कंपनीकडे होते. आता दुसऱ्या कंपनीकडे काम दिले आहे. यावर पुन्हा नवीन अभ्यास सुरू आहे. पुणे ते साताऱ्यापर्यंत चांगला महामार्ग करण्यासाठी सहा हजार कोटींचा नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. यावर विभागातर्फे लवकरच काम सुरू केले जाईल. खंबाटकी घाटातील नवीन टनेल खुले केले जाईल.
सातारा ते कोल्हापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम ठेकेदार कंपनीस दिले आहे; पण काही अडचणी आल्या आहेत. पुढच्या आठवड्यात यावर आढावा बैठक घेणार आहे. कामासंबंधी काही सूचना कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती आणि इतरांनी दिल्या आहेत. त्यांचीही दखल घेतली आहे. पुढच्या एक वर्षात हे कामही पूर्ण केले जाईल, असा प्रयत्न आहे.