कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगराध्यक्षपदे खुली, ओबीसीसाठी एकही पद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:35 IST2025-10-07T12:24:32+5:302025-10-07T12:35:29+5:30

राजकीय जोडण्या सुरू : शिरोळ, हुपरी, गडहिंग्लजला पदे आरक्षित 

Mayors will be elected from open groups in 10 of the 13 municipalities, municipal councils and municipal panchayats in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगराध्यक्षपदे खुली, ओबीसीसाठी एकही पद नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगराध्यक्षपदे खुली, ओबीसीसाठी एकही पद नाही

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींपैकी १० ठिकाणी खुल्या गटातून नगराध्यक्ष होणार असून शिरोळ, हुपरी आणि गडहिंग्लजची पदे आरक्षित झाली आहेत. दहापैकी पाच पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. कार्यकर्त्यांसाठीच्या या निवडणुकीमुळे आता मंत्री, खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

सोमवारी दुपारपर्यंत आरक्षणाची माहिती मिळाल्यानंतर प्रत्येक पक्षांकडील इच्छुकांची प्राथमिक यादीही त्या त्या शहरात चर्चेत आली. थेट जनतेतून ही नगराध्यक्ष निवड होणार आहे. जिल्ह्यातील एकही नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित झालेले नाही.

कागलमध्ये सलग तिसऱ्यांदा महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राजकीय प्रचंड संघर्ष असलेल्या कागल शहरामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या गटात पुन्हा संघर्ष उफाळणार आहे. जयसिंगपूरचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होणार असली तरी गटातटावर ही निवडणूक होणार आहे. गेल्यावेळी ताराराणी आघाडीची मोट बांधणारेच यड्रावकर गटात सहभागी झाल्याने विरोधी नेत्यांना नव्याने आघाडी बांधावी लागणार आहे.

शिरोळचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक नेत्यांकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. महायुती व यड्रावकर गटाकडून आमदार डॉ. माने यांच्या स्नुषा यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळणार की गटाचे राजकारण होणार यावर उमेदवारी अवलंबून आहे.

पन्हाळा नगराध्यक्षपद महिलेसाठी खुले झाल्याने जनसुराज्य व स्थानिक आघाडी यात पुन्हा संघर्ष होणार आहे. या ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे हे सत्ता हस्तगत करण्यासाठी टोकाचे प्रयत्न करणार यात शंका नाही.

पेठवडगावचे नगराध्यक्षपद खुले झाल्यामुळे थेट लढत होण्याची शक्यता आहे. यादव पॅनल आणि युवक क्रांती आघाडी यांच्यात जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

हातकणंगले नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने महायुती आणि महाआघाडीचे नेत्यांची उमेदवारी निवडीत कसोटी लागणार आहे. हे पद खुले झाल्याने महायुती एकसंध राहणार का? हाच खरा प्रश्न आहे.

चंदगडचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सामना चुरशीचा होणार आहे. गेल्या वेळी चंदगड शहर विकास आघाडीने अनेक गटांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्षपद मिळविले होते. गेल्या वेळचा वचपा काढण्यासाठी भाजपकडूनही यावेळी आधीच व्यूहरचना करण्यात आली आहे.

आजऱ्याचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने यंदाही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. नगरपंचायतीत सुरू झालेली चराटी-शिंपी गटाची समझोता एक्स्प्रेस पुढे राहणार की सवतासुभा मांडणार, याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.

मलकापूर नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडल्यामुळे अनेकांचे मनसुबे उधळले आहेत. महायुतीकडून विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना येथे रंगेल.

मुरगुडमध्ये प्रचंड चुरस

मुरगुडचे नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाले असले तरी विविध पक्षप्रवेशांमुळे यंदाही येथे प्रचंड चुरस होणार आहे. मुरगूडमध्ये सत्तेत येण्यासाठी कोणत्याही दोन किंवा तीन गटांना एकत्र येऊनच निवडणुकीला सामोरे जावे लागते. सध्या शहरात राजकीय वारे जोरात वाहत आहे. काही उलथापालथीही होत आहे. नगर परिषदेवर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्या पाटील गटात उभी दुफळी पडली आहे. दोन भावात दरी निर्माण झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत आहे.

कुरुंदवाडमध्ये नेत्यांच्या जागी सुना

कुरुंदवाड पालिका नगराध्यक्ष आरक्षण महिलेसाठी खुले झाल्याने शहरातील गटनेते ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख तीनही नेत्यांच्या घरातील महिलांची नावे चर्चेत आली आहेत. शहरात सध्या जयराम पाटील (काँग्रेस), रामचंद्र डांगे (भाजपा) व रावसाहेब पाटील (राष्ट्रवादी) असे प्रमुख तीन गट आहेत.

हुपरी नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव

हुपरीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे. लढत दुरंगी की तिरंगी याबाबत चर्चेचा खल सुरू आहे. गतवर्षी निसटता पराभव झालेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शतप्रतिशत भाजपचा नारा देत या भागातील वर्चस्वाच्या लढाईसाठी पायाभरणी केली आहे, तर विरोधकाही जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

गडहिंग्लजला राष्ट्रवादीकडे गर्दी

गडहिंग्लजचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून, खरा सामना राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल असाच रंगणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी असून, जनता दलाला सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था व आरक्षण

  • कागल : महिला
  • जयसिंगपूर : सर्वसाधारण
  • कुरुंदवाड : महिला
  • पन्हाळा : महिला
  • पेठवडगाव : सर्वसाधारण
  • हातकणंगले : सर्वसाधारण
  • चंदगड : सर्वसाधारण
  • आजरा : सर्वसाधारण
  • मलकापूर : महिला
  • मुरगुड : महिला
  • हुपरी : अनुसूचित जाती
  • गडहिंग्लज : अनुसूचित जाती
  • शिरोळ : अनुसूचित जाती महिला

Web Title : कोल्हापुर नगरपालिका चुनाव: दस खुले पद, ओबीसी आरक्षण नहीं

Web Summary : कोल्हापुर नगरपालिका चुनावों में दस अध्यक्ष पद खुले, पांच महिलाओं के लिए आरक्षित। कागल, पन्हाला और हातकणंगले में मुख्य मुकाबले। शिरला अनुसूचित जाति महिला के लिए आरक्षित। ओबीसी आरक्षण नहीं। राजनीतिक दांव ऊंचे हैं।

Web Title : Kolhapur Municipal Elections: Ten Open Seats, No OBC Reservation

Web Summary : Kolhapur's municipal elections see ten open mayoral seats, five for women. Key contests include Kagal, Panhala, and Hatkanangale. Shirala reserved for SC woman. No OBC reservation. Political stakes are high.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.