Kolhapur: इचलकरंजीत गॅस पाइपलाइनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:03 IST2026-04-01T19:01:36+5:302026-04-01T19:03:24+5:30
५ ते १० किलोमीटर अंतरावरून दिसत होते धुराचे लोट

Kolhapur: इचलकरंजीत गॅस पाइपलाइनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
इचलकरंजी : शांतीनगर येथील मोकळ्या जागेत ठेवलेल्या नॅचरल गॅस पाइपलाइनला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता घडली. भीषण आगीच्या लोटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरामध्ये नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी मागविण्यात आलेली पाइप ही शांतीनगरजवळ असलेल्या आरगे भवनच्या मागील पटांगणात ठेवण्यात आली होती. त्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अगदी ५ ते १० किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते.
महापालिकेच्या अग्निशमनच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. त्याच्या शेजारी असलेल्या ऑक्सिजन पार्कमधील झाडांनाही आगीची झळ बसली व काही अंशी झाडेही जळाली. आगीची माहिती मिळताच महापौर उदय धातुंडे यांच्यासह काही नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.