रिलला विरोध केल्याने तामिळनाडूत मराठी तरुणावर हल्ला, चार अल्पवयीन मुले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:25 IST2025-12-31T12:24:34+5:302025-12-31T12:25:44+5:30
जखमी तरुण कोल्हापूरचा असल्याची चर्चा

रिलला विरोध केल्याने तामिळनाडूत मराठी तरुणावर हल्ला, चार अल्पवयीन मुले ताब्यात
कोल्हापूर : रेल्वेत मानेवर कोयता ठेवून रिल करण्यास विरोध केल्याने सूरज (वय. ३४) नावाच्या मराठी तरुणावर चौघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत सूरज गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा प्रकार तिरुवल्लूर जिल्ह्यातील थिरुथानी रेल्वे स्थानकाजवळ घडला. जखमी तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे.
तामिळनाडूचे भाजप उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करून तामिळनाडूतील सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या व्हिडीओत चार अल्पवयीन तरुण सूरज नावाच्या मराठी तरुणाला कोयत्याने निर्घृण मारहाण करीत असल्याचे दिसते. सूरज त्यांच्याकडे हात जोडून क्षमायाचना करीत होता. तरीही सर्वांगावर कोयत्याने वार करून रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सोडून ते निघून गेले.
याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी जखमी सूरज याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत कोल्हापूर पोलिसांशी विचारणा केली असता, तामिळनाडू पोलिसांकडून काही माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.