मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा

By Admin | Updated: September 6, 2015 23:36 IST2015-09-06T23:36:35+5:302015-09-06T23:36:35+5:30

हरी नरके : रंगराव मांडरे यांचा द्वितीय स्मृतिदिन; मराठी 'संस्कृत'ची मावशी

Marathi will soon be the classical language language | मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा

मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा

कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. जगातील विद्वानांनी मराठीचे महत्त्व मान्य केले असून केंद्र सरकारनेही त्याला मान्यता दिली आहे. मराठी ही ‘संस्कृत’ची मावशी आणि ‘पाली’ची सख्खी बहीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी शुक्रवारी केले. राजेंद्रनगर येथील क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूलतर्फे रंगराव मांडरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. अभिजात मराठी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी मधुकर शिर्के होते. प्रा. नरके म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृतमधून निर्माण झाली आहे, हा गैरसमज आहे. संस्कृत भाषेपूर्वी भारतात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर झाल्याचे संशोधनात आढळले आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारला तब्बल सहाशे पुरावे दिले आहेत. केंद्र सरकारनेही याला मान्यता दिली आहे. तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम व उडिया भाषांना अभिजात भाषांच्या पंक्तीत मराठी जाणार आहे. मायमराठी ही जगातील एक समृद्ध परंपरा असलेली भाषा आहे. जगातील २० हजार भाषांत मराठी ही २० व्या क्रमांकाची भाषा आहे. इंग्रजीनंतर जगातील सर्वाधिक शब्दकोश मराठी भाषेतच आहेत. या भाषेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हे मराठी भाषेचेच आहेत; पण मराठीला आपणच कमी लेखत असल्यामुळे तिची हानी झाली आहे, अशी खंतही प्रा. नरके यांनी व्यक्त केली. प्रा. नरके म्हणाले, जीवनातील सर्व अंगे मराठीतून मांडली आहेत. ही भाषाच आपले ओळखपत्र आहे. या भाषेतच संत तुकारामांनी अभंग लिहिले. या अभंगांची मोहिनी जागतिक स्तरावरील लेखकांनाही आहे; पण आपण तुकाराम वाचत नाही. यावेळी अनुराधा मांडरे, बाबासाहेब वडगांवकर, राहुल मांडरे, वसंत कांबळे-लिंगनूरकर, दया मांडरे, आदी उपस्थित होते. मनीषा सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष भोसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)



अभिजात म्हणजे उच्चकुलिनांची भाषा नव्हे
अभिजात म्हटले की ती उच्चकुलीन लोकांची भाषा, असा गैरसमज वर्षानुवर्षे आहे. काहींनी त्याची मांडणीही अशीच केली होती; पण अभिजात म्हणजे दर्जेदार, श्रेष्ठ; मग ते सर्वसामान्य व्यक्तीने का लिहिलेले असो, असे मतही प्रा. हरी नरके यांनी मांडले.

Web Title: Marathi will soon be the classical language language