मानसिंग बोंद्रेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:02 IST2021-12-23T18:01:56+5:302021-12-23T18:02:36+5:30
गेल्या सोमवारी (दि. १३) मध्यरात्री मानसिंग बोंद्रे व त्याचा साथीदार यदूराज यादव या दोघांनी अंबाई टँक परिसरात रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

मानसिंग बोंद्रेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात अंबाई टँक परिसरात अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग विजय बोंद्रे (वय ३५ रा. अंबाई टॅंक परिसर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, गुरुवारी फेटाळला. त्यामुळे त्याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला. बोंद्रे कोणत्याही क्षणी पोलिसाकडे हजर होण्याची शक्यता आहे.
गेल्या सोमवारी (दि. १३) मध्यरात्री मानसिंग बोंद्रे व त्याचा साथीदार यदूराज यादव या दोघांनी अंबाई टँक परिसरात रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याचा चुलतबंधू अभिषेक बोंद्रे याने त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेनंतर मानसिंग बोंद्रे पसार झाला. त्याचा साथीदार यादव याला पोलिसांनी अटक करून घटनेतील रिव्हॉल्व्हर जप्त केली.
दरम्यान, पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी मानसिंग बोंद्रे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन गुरुवारी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. विवेक शुल्क यांनी काम पाहिले. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याला आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.