Crime: एकत्र पिले..जेवलेही!, गाडीवरुन जाताना वाद उफाळला; केबलने गळा आवळून मित्राचा मृतदेह खांबाला बांधला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:04 IST2025-12-02T12:03:00+5:302025-12-02T12:04:37+5:30
१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले

Crime: एकत्र पिले..जेवलेही!, गाडीवरुन जाताना वाद उफाळला; केबलने गळा आवळून मित्राचा मृतदेह खांबाला बांधला
कोल्हापूर : जेवायला गेल्यानंतर आईवरून शिवी दिल्याच्या रागातून दारूच्या नशेत मित्राने सिद्धू शंकर बनवी (वय २०, रा. वाशी नाका, कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याचा केबलने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर मृतदेह फुटपाथवर टेलिफोनच्या खांबाला बांधून ठेवला होता.
हा प्रकार यल्लम्मा चौक ते हॉकी स्टेडियम चौकादरम्यान विश्वपंढरीजवळ सोमवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास घडला. पोलिसांनी सहा तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपी मनीष जालिंदर राऊत (२८, रा. कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली. आईवरून शिवी दिल्याच्या रागातून त्याचा खून केल्याची कबुली मनीषने दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू बनवी हा मूळचा कर्नाटकातील असून, गेल्या वर्षभरापासून कळंबा रिंगरोड येथे भावाकडे राहत होता. जवळच राहायला असलेला मनीष राऊत याच्याशी त्याची मैत्री झाली. रविवारी रात्री दोघे दारू पिऊन सिद्धूच्या दुचाकीवरून व्हिनस कॉर्नर येथे जेवायला गेले. जेवताना त्यांचा वाद झाला.
सिद्धूने आईवरून शिवी दिल्याचा राग आरोपी मनीष याच्या मनात होता. जेवण करून मध्यरात्रीनंतर ते घराकडे निघाले. हॉकी स्टेडियम रोडवरील विश्वपंढरीसमोर आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दुचाकी थांबवून दोघांमध्ये झटापट सुरू झाली. त्यावेळी मनीष याने फुटपाथवरच्या टेलिफोन खांबावरून लोंबकळणाऱ्या केबलने सिद्धूचा गळा आवळला. त्यानंतर केबलने त्याला खांबाला बांधून तो दुचाकी घेऊन निघून गेला.
पहाटे चारच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळाली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सहकाऱ्यांसह जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही गुन्ह्याचा समांतर तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि अंमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मनीष राऊत याला वाशी नाका येथून ताब्यात घेतले.
१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले
गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक ते स्टेशन रोड, दसरा चौक, सुभाष रोड, हॉकी स्टेडियम परिसरातील १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यात ते दोघे प्रथम व्हिनस कॉर्नर येथे दिसले. त्यानंतर दुचाकीवरून ते सुभाष रोडने हॉकी स्टेडियमकडे गेल्याचे दिसले. त्यावरून गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना मदत झाली.
दोघेही अविवाहित
आरोपी राऊत हा शेतकरी असून, त्याच्या १५ म्हशी आहेत. आईवडिलांसोबत तो कळंबा रिंगरोड येथे राहतो. मयत सिद्धू हा मूळचा कर्नाटकातील असून, वर्षभरापूर्वी कळंबा रिंग रोड येथील भावाकडे राहायला आला होता. त्याचे आई, वडील गावाकडे राहतात. हे दोघे अविवाहित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेने खळबळ
वर्दळीच्या रस्त्याकडेला फुटपाथवर टेलिफोनच्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच शहरात खळबळ उडाली. पहाटे फिरायला जाणाऱ्या काही व्यक्तींनी याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. हा खून की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, अवघ्या सहा तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटक केली.