Kolhapur: वाद मिटवायला बोलवून तलवारीने केला जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी, सहा हल्लेखोरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:08 IST2025-12-30T12:08:25+5:302025-12-30T12:08:38+5:30
एकमेकांकडे बघण्यावरून वाद

Kolhapur: वाद मिटवायला बोलवून तलवारीने केला जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी, सहा हल्लेखोरांना अटक
कोल्हापूर : एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून तीन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटविण्यासाठी बोलवून सहा जणांनी दोघांवर तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार सोमवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास छत्रपती शिवाजी स्टेडियमनजीक जलतरण तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. यात सम्राट शेखर पाटील (वय १७, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर, कोल्हापूर) आणि विवेक जयदीप मेस्त्री (२१, रा. राजारामपुरी) हे दोघे गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी सम्राट पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. पार्थ पाटील, द्रोणक त्रिमुखे (बकासूर), ऋषिकेश इंद्रेकर, श्रेयस पोळ, साहिल देसाई आणि समर्थ स्वामी (सर्व रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सम्राट पाटील आणि हल्लेखोर पार्थ पाटील या दोघांमध्ये शनिवारी (दि. २७) एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी पार्थ याने सोमवारी सम्राट याला छत्रपती शिवाजी स्टेडियमजवळ बोलवून घेतले.
सम्राट आणि विवेक दोघे येताच पार्थने लोखंडी रॉडने, त्रिमुखे याने तलवारीने आणि ऋषिकेश इंद्रेकर याने लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केली. मारहाणीत सम्राटच्या डोक्यात, तर विवेकच्या पाठीत गंभीर दुखापत झाली. दोघांवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. मारहाणीनंतर जखमींच्या मित्रांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली होती.