Kolhapur: अंबाबाई मंदिर सुरक्षेची पोलखोल अंगलट, एकास अटक; कमरेला पिस्तूल लावून केला होता मंदिरात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:58 IST2025-12-31T11:58:27+5:302025-12-31T11:58:40+5:30
राहुल चतुर्वेदी याचा शोध सुरू, बंदोबस्तावरील पोलिसांना प्रकरण भोवणार

Kolhapur: अंबाबाई मंदिर सुरक्षेची पोलखोल अंगलट, एकास अटक; कमरेला पिस्तूल लावून केला होता मंदिरात प्रवेश
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी सोमवारी (दि. २९) कमरेला पिस्तूल लावून आत जाणारा भाविक राहुल चतुर्वेदी याच्यासह सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता संभाजी उर्फ बंडा माधवराव साळुंखे (रा. धोत्रे गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) या दोघांवर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शस्त्र कायदा आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साळोखे याला अटक केली. मंदिर सुरक्षेचे पडताळणी करण्याचा प्रकार दोघांना अंगलट आला. चतुर्वेदी याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबाबाई मंदिरातील ढिसाळ सुरक्षा व्यवस्था आणि बंद पडलेल्या यंत्रसामग्रीची वस्तुस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता बंडा साळुंखे आणि मुंबईतील भाविक राहुल चतुर्वेदी हे कमरेला पिस्तूल लावून मंदिरात गेले होते. त्यांनीच याचा व्हिडिओ तयार करून सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, सुरक्षा भेदून थेट पिस्तुलासह मंदिरात जाण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
जिल्हा प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन साळुंखे आणि चतुर्वेदी यांच्यावर गुन्हा दाखल केला. साळुंखे याला सोमवारी रात्री अटक केली, तर चतुर्वेदी याचा शोध सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेला मनाई आदेश आणि शस्त्र परवाना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. साळुंखे याला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली. याप्रकरणी सहायक फौजदार संगीता रघुनाथ विटे यांनी फिर्याद दिली.
चतुर्वेदी राजकीय बांधकाम व्यावसायिक
पिस्तूल घेऊन मंदिरात जाणारा चतुर्वेदी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आहे. तो मूळचा वाराणसी येथील असून, एका राजकीय पक्षाचा पदधिकारी असल्याचे साळुंखे याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडील पिस्तूल खरे होते की खोटे, याचा उलगडा त्याला ताब्यात घेतल्यानंतरच होणार आहे.
ठरवून केली सुरक्षेची पोलखोल
नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. त्यानंतर मात्र हळूहळू सुरक्षा व्यवस्थेत शिथिलता येते. मेटल डिटेक्टर, स्कॅनरची वेळेवर दुरुस्ती होत नाही. बंदोबस्तावरील कर्मचारी मोबाइलमध्ये दंग असतात. मेटल डिटेक्टरच्या बाजूने लोकांची ये-जा सुरू असते. सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा दाखवण्यासाठी साळुंखे आणि चतुर्वेदी यांनी ठरवून पिस्तूलसह मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली.
बंदोबस्तावरील पोलिसांना प्रकरण भोवणार
मंदिराच्या चार दरवाजांवर प्रत्येकी तीन पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतात. याशिवाय देवस्थान समितीचे सुरक्षारक्षकही मदतीला उपस्थित असतात. रोज सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून मंदिराची तपासणी केली जाते. या सर्वच कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. लवकरच चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे सादर करणार असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.