Kolhapur Politics: नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होणार, कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:27 IST2025-10-15T13:27:05+5:302025-10-15T13:27:35+5:30
महायुतीकडूनच जोरदार मागणी : सर्वांना संधी देण्यासाठी निर्णय घेण्यासाठी दबाव

Kolhapur Politics: नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होणार, कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला जोर
कोल्हापूर : महायुतीमधील सर्व घटक पक्षांना नगराध्यक्षपदाची संधी मिळण्यासाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत रद्द करण्याची मागणी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असून, तसा निर्णय होण्याची शक्यता आहे. जरी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडले असले, तरी निवडून आलेल्यातील महायुतीच्या कोणाला ना कोणाला तरी संधी मिळणार असल्याने हा निर्णय लवकर घ्यावा यासाठी आमदार, खासदारांकडे कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू आहे.
मुदत संपल्यानंतर अनेक महिने आणि वर्षांनी नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याआधी थेट नगराध्यक्ष निवडीच्या पध्दतीत काही ठिकाणी सत्ता युतीची आणि नगराध्यक्ष आघाडीचा असे प्रकार राज्यात घडले होते. तसेच एकदा का नगराध्यक्ष निवडला की पाच वर्षे फारसे काही हातात राहत नाही. जरी सर्व नगरसेवक एका पक्षाचे असले आणि विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष असेल, तर त्यांना डावलून कोणताही कार्यक्रम घेता येत नाही. जर एखादा हट्टी नगराध्यक्ष असेल, तर विरोधकांची आणखीनच अडचण वाढते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात तीन पक्षांसोबत जनसुराज्य हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष पद्धत रद्द केल्यास तीन, चार पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदाची संधी देता येते. ही संधी मिळणार असल्यामुळे महायुती म्हणून ताकदीने काम केले जाईल आणि अधिकाधिक नगरपालिका ताब्यात येतील असे समर्थन करण्यात येत आहे. जरी मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी नंतर एकत्र येवून महायुतीची सत्ता स्थापन करून अशा पद्धतीने पदांची विभागणी करून कारभार करणे सोयीचे होऊ शकते, असा दावा केला जात आहे.
नगराध्यक्ष निवडीसाठीच लावली जाते ताकद
याबाबत एका माजी आमदारांनी सांगितले की, नगराध्यपदासाठी शक्यतो नेते, त्यांच्या घरातील कोणी किंवा जवळचा कार्यकर्ता उमेदवार असतो. ही निवडणूक प्रतिष्ठेची होते आणि नेत्याचे, गटाचे, पक्षाचे सर्व लक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रित होते. परिणामी पक्षाचे खालचे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात आणि त्यांचा पराभव होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा ही पद्धत बदलण्याची गरज आहे.
कार्यकर्त्यांच्या अपेक्षा
महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने थेट नगराध्यक्षपदापेक्षा नगरसेवकांमधून निवड ही पूर्वीची पद्धत आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवकांचेही वजन राहते. हे आम्ही महायुतीच्या नेत्यांना पटवून सांगितले आहे, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.