पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:30 IST2022-02-21T17:29:50+5:302022-02-21T17:30:32+5:30
"माझी वसुंधरा अभियान" राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर : माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 'माझी वसुंधरा अभियान' बाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महसूल विभागाची बैठक कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री ठाकरे म्हणाले, "माझी वसुंधरा अभियान" राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पर्यावरण रक्षणासाठी या अभियानांतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. या अभियानाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून यात जनसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. या अभियानात शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण, वयस्कर अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी करुन घ्यावे, जेणेकरुन हे अभियान लोकचळवळ होईल. विभागातील सर्व जिल्ह्यांनी खूप चांगले उपक्रम राबवले असल्याबाबत कौतुक करून या कामाची एकत्रित पुस्तिका तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी 'माझी वसुंधरा' चे उपसंचालक सुधीर बोबडे यांनी सादरीकरणातून अभियान, वैशिष्ट्ये, बक्षिस व उपक्रमांची माहिती दिली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागात झालेल्या कामाची माहिती दिली. यावर्षी सौर ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरच्या सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अभियानांतर्गत शहर व जिल्ह्यात केलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. यावेळी सौर ऊर्जा, सौरपंपाचा वापर, बायोगॅस प्लॅन्ट, फुलपाखरु उद्यान, बागबगीचा सुशोभीकरण, जलपर्णीवर उपाययोजना, नदी स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणची साफसफाई, जल व हवा प्रदूषण नियंत्रण आदी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.