Shaktipeeth Mahamarg: ‘शक्तिपीठ’चा नवा मार्ग, गावांची यादी व्हायरल... अधिकृत दुजोरा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:16 IST2026-01-10T12:15:26+5:302026-01-10T12:16:19+5:30
नव्या मार्गाशी साधर्म्य गावे : अधिकृत खुलासा करण्याची मागणी

Shaktipeeth Mahamarg: ‘शक्तिपीठ’चा नवा मार्ग, गावांची यादी व्हायरल... अधिकृत दुजोरा नाही
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यातील गावांची यादी समाज माध्यमातून व्यापक प्रमाणात व्हायरल झाली आहे. या यादीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यामुळे यादी अधिकृत असल्याबाबत दुजोरा मिळत नाही. बाधित गावांपर्यंत नवी यादी पोहोचल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
यामध्ये ज्यांची शेती बाधित होणार आहे, ते शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करण्यासाठी धडपडत आहेत. यामुळे व्हायरल होणाऱ्या यादीसंबंधी रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या पूर्वीच्या आराखड्यातील बाधित गावांतून व्यापक प्रमाणात विरोध झाला. यामुळे राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याची घोषणा केली आहे. नव्या आराखड्यानुसार मार्ग कोठून जाणार, याची अधिकृत माहिती रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही. यासंबंधी अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. नव्या मार्गाचा विषय काढताच मोबाईल कट करत आहेत. काही अधिकाऱ्यांनी मोबाईलही उचलणे बंद केले आहे. इतकी गोपनीयता यावर ठेवली आहे.
दरम्यान, सरकारने घोषणा केलेल्या नव्या मार्गाशी साधर्म्य असलेल्या गावांची यादी गेल्या दोन दिवसांपासून व्यापक प्रमाणात समाज माध्यमातून व्हायरल झाली आहे. या यादीत हातकणंगले तालुक्यातील पारगाव, करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातील संभाव्य बाधित गावांची यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातील गवसे, बुझवडे, कुरणी, इनाम म्हाळुंगे, बिजूर, भोगोली, झांबरे तर करवीर तालुक्यातील केर्ली, वरणगे, पाडळी अशा गावांचा समावेश आहे.
कागलमधील एकच गाव
व्हायरल झालेल्या बाधित गावांच्या यादीत कागल तालुक्यातील उंदरवाडी हे एकमेव गाव आहे. कागल तालुक्यातून पहिल्यापासूनच शक्तिपीठ मार्गाला तीव्र विरोध राहिला आहे. याची दखल व्हायरल यादीतून घेतल्याचे दिसते.
राज्य शासनाने घोषणा केलेल्या शक्तिपीठच्या बदलेलेल्या मार्गातील बाधित गावांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीला रस्ते विकास महामंडळाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी नव्या मार्गाशी साधर्म्य असलेल्या मार्गातील गावे आहेत. - गिरीश फोंडे, समन्वयक, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर.