कोल्हापुरात काम बंद ठेवून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा वकिलांनी केला निषेध, दोषी वकिलास शिक्षेची एकमुखी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:22 IST2025-10-08T12:19:03+5:302025-10-08T12:22:05+5:30
पाचशेवर खटल्याचे कामकाज ठप्प :

कोल्हापुरात काम बंद ठेवून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा वकिलांनी केला निषेध, दोषी वकिलास शिक्षेची एकमुखी मागणी
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हे राज्य घटनेवरील हल्ल्याचे षडयंत्र आहे. याची सखोल चौकशी करून दोषी वकिलास आणि घटनेमागील सूत्रधारांना शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्हा बार असोसिएशनच्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील वकिलांच्या निषेध सभेत करण्यात आला. जिल्हा न्यायालयात कामकाजापासून अलिप्त राहून वकिलांनी निषेध नोंदवला. कामकाजापासून वकील अलिप्त राहिल्याने जिल्हा न्यायालयात सुमारे ५०० खटल्यांचे कामकाज होऊ शकले नाही.
सरन्यायाधीश गवई यांच्यावर सोमवारी एका वकिलाने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा बार असोसिएशनची निषेध सभा झाली. जिल्हा न्याय संकुलाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या सभेत सेवानिवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी तीन ठराव मांडले. हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध, सनातनी प्रवृत्तीचा निषेध आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीच्या ठरावांना उपस्थितांनी मंजुरी दिली. आगामी तीन दिवस लाल फिती लावून काम करण्याचा निर्णय झाला.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस, अजित मोहिते, समीउल्ला पाटील, किरण पाटील, रणजीत गावडे, सर्जेराव खोत, शिवाजीराव राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी बाहेर येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या.
सर्किट बेंचमध्येही निषेध सभा
सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल सर्किट बेंचच्या बार रूममध्ये वकिलांची निषेध सभा झाली. वकिलांनी घटनेचा निषेध नोंदवून दोषींवर कारवाई मागणी केली. मात्र, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा, की सनातनी विचारांचा निषेध करावा यावरून वकिलांमध्ये मतभेद झाला. अखेर ज्येष्ठ वकिलांनी यात मध्यस्थी केल्याने हल्लेखोराच्या सनातनी प्रवृत्तीचा निषेध करण्यावर एकमत झाले.
पोलिसांत तक्रार देणार
लोकशाही वाचविण्यासाठी निषेध सभेत ॲक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांची सर्वानुमते निवड झाली असून, हल्लेखोराच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकशाहीवर घाला घालणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात कोल्हापुरातून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला.