कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि दोडमार्ग तालुक्यामधून टाचणीच्या एका नव्या प्रजातीला शंकराला आवडणाऱ्या शांभवीचे नाव संशोधकांनी दिले आहे. आंबोलीतील हिरण्यकेशी येथील शंकराच्या मंदिरात संशोधकांना ही प्रजात सर्वप्रथम दिसल्यामुळे त्यांनी या प्रजातीचे 'प्रोटोस्टिक्टा शांभवी' असे नामकरण केलेले आहे.चतुर प्रजातींमधील टाचणीचा समावेश स्वतंत्र गटात होतो. यातील 'प्रोटोस्टिक्टा' कुळातील टाचणीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. आयुकारा विवेक चंद्रन, डाॅ. दत्तप्रसाद सावंत, रेजी चंद्रन, डाॅ. पंकज कोपर्डे, हेमंत ओगले, अभिषेक अशोक राणे आणि डाॅ. कृष्णमेघ कुंटे यांनी केरळ आणि आंबोली दोडामार्गातून ही नवी प्रजात शोधली आहे.यासंबंधीचे संशोधन शुक्रवार, दि. १५ ऑगस्टला ‘झुटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे. केरळातून शोधलेल्या प्रजातीला प्रोटोस्टिक्टा सॅन्गुनिथोरॅक्स (किरमिजी छायासुंदरी) आणि आंबोली - दोडामार्गमधून शोधलेल्या प्रजातीला प्रोटोस्टिक्टा शांभवी (कोकण छायासुंदरी) असे नाव दिले आहे. ही प्रजात सर्वप्रथम डाॅ. दत्तप्रसाद सावंत आणि हेमंत ओगले यांना जून २०२१मध्ये आंबोलीतील हिरण्यकेशी मंदिराच्या परिसरात दिसली होती. त्यांना ही प्रजात 'प्रोटोस्टिक्टा सॅंगुइनोस्टिग्मा' म्हणजेच लाल ठिपक्यांची छायासुंदरी वाटली. नंतर हीच प्रजात त्यांना आंबोलीजवळच्या नेने गावातही आढळली.त्यांनी तेथील या प्रजातीचे नमुने बंगळुरू येथील ‘नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स'च्या (एनसीबीएस) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, ऑगस्ट २०२४मध्येही ही प्रजात दोडामार्ग जिल्ह्यातील 'वानोशी फॉरेस्ट होम स्टे'च्या आवारातील ओढ्यात अभिषेक राणे यांनाही आढळली. अखेर ही प्रजात नवीन असल्याचे आढळले.शांभवी नाव का ?शांभवी हे नाव ‘शिवाची पत्नी’ किंवा ‘पार्वती’चे मानले जाते. ही प्रजात प्रथम हिरण्यकेशीजवळ शंकराच्या मंदिरात दिसल्याने संशोधकांनी तिचे नामकरण शंकराला आवडणाऱ्या पार्वतीवरून ठेवले. विश्रांती घेण्यासाठी त्या छायेत बसतात आणि दिसायला सुंदर दिसतात तसेच कोकणातून शोधल्यामुळे मराठीत तिला कोकण छायासुंदरी म्हणून ओळखले जाईल. ही प्रजात ४.५ सेंटीमीटर आकाराची असून, ती मे ते जुलै महिन्यापर्यंत दिसते.
१०३ वर्षांनंतर या दोन प्रजातींची विभागणी झाली आहे. जनुकीय अभ्यासानुसार ही प्रजात लाल ठिपक्यांच्या छायासुंदरीपेक्षा ११ टक्क्यांनी वेगळी आहे. तिच्या पोटाकडील आणि शेपटीकडील उपांगाची आकारशास्त्रीय मांडणी केल्यानंतर व गुणसूत्र तपासणीनंतर ही बाब लक्षात आली आहे. - डाॅ. दत्तप्रसाद सावंत, संशोधक.