कोल्हापूर जि.प.च्या शाळा सुधार मोहिमेची राज्यात दखल, राज्यस्तरीय समितीवर कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:49 IST2026-03-28T15:49:10+5:302026-03-28T15:49:28+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने चक्क ग्रेनाइट, मार्बलचा वापर करून प्राथमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. या ठिकाणी मुलींच्या ...

कोल्हापूर जि.प.च्या शाळा सुधार मोहिमेची राज्यात दखल, राज्यस्तरीय समितीवर कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती
कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषदेने चक्क ग्रेनाइट, मार्बलचा वापर करून प्राथमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. या ठिकाणी मुलींच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली आहे. या सर्व सोयीसुविधांची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे अशा शाळांची या ‘कोल्हापूर स्टाइल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स’ उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सर्व खासदार आणि आमदारांनी जिल्हा नियोजन समिती आणि वित्त आयोगातून मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून आतापर्यंत १०० शाळांमध्ये अशी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.
उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी सुमोटो दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. यासाठी जिल्हा पातळीवरही समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ६ जानेवारी २०२६ रोजी या समितीच्या बैठकीत केलेल्या सादरीकरणाची दखल घेत कार्तिकेयन यांची राज्याच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी कार्तिकेयन यांनी मुंबईत या बैठकीत सहभाग घेतला.