Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:04 IST2026-01-19T20:03:54+5:302026-01-19T20:04:45+5:30
भविष्यवेत्त्याची गरज नाही

Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : महायुती म्हणून जिल्ह्यात सर्वत्र युती होण्यास फार वाव नाही, असे सध्याचे चित्र आहे. परंतु अधिकाधिक जागांवर एकत्र येण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत विरोधकांचा फायदा होऊ न देण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी बैठकीत घेतल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते रविवारी पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, सर्वच ठिकाणी सर्व घटक पक्ष एकत्र येतील असे दिसत नाही. परंतु काही तालुक्यात राष्ट्रवादी शिवसेना, काही ठिकाणी भाजप शिवसेना काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र येऊ शकतात. ६८ पैकी किमान ५० जागा महायुती म्हणून कशा मिळतील यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. शक्य असेल तर ६८ ठिकाणी महायुती करा आणि ते शक्य नसेल तर वेगळे लढा परंतु कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत युती करायची नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
भविष्यवेत्त्याची गरज नाही
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे सांगण्यासाठी आता भविष्यवेत्त्याची गरज नाही. आता ते जिल्हा परिषदेला एकत्र येणार की आणखी कोणत्या निवडणुकीत हे मला माहिती नाही. परंतु युती म्हणून आम्ही ज्या जागा राष्ट्रवादीला देऊ त्यामध्ये ते वाटप करून लढतील असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.