युवतीच्या तक्रारीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक तडकाफडकी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:38 IST2025-10-08T11:37:46+5:302025-10-08T11:38:06+5:30
जिल्हा परिषदेत खळबळ उडाली

युवतीच्या तक्रारीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक तडकाफडकी निलंबित
कोल्हापूर : मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील युवतीच्या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक नीलेश म्हाळुंगेकर यांना मंगळवारी संध्याकाळी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही कारवाई केली. म्हाळुंगेकर हे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे कोल्हापूर शाखा जिल्हाध्यक्ष असल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.
संबंधित युवती ही अकरा महिन्यांसाठी कार्यरत होती. तिची मुदत २९ सप्टेंबरला संपली. त्यानंतर तिने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. कार्तिकेयन यांना टपालातून सोमवारी संध्याकाळी हा अर्ज प्राप्त झाला. मंगळवारी दिवसभरात प्राथमिक माहिती घेऊन निलंबन करण्यात आले. म्हाळुंगेकर यांना निलंबन काळात आजरा पंचायत समितीमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अंतर्गत चौकशी होणार
जिल्हा परिषदेतील अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊ शकते. यामध्ये म्हाळुंगेकर दोषी ठरल्यास निलंबन कायम राहील. जर ते दोषी नसतील तर निलंबन कारवाई मागेही घेण्यात येऊ शकते.
हा माझ्याविरोधातील कुटिल डाव आहे. निलंबन आदेशामध्ये कशाबद्दल निलंबन केले आहे याचा स्पष्ट उल्लेख नाही. बदल्यांविरोधात संघटना पदाधिकारी म्हणून आवाज उठविल्याने ही कारवाई झाली आहे.- नीलेश म्हाळुंगेकर