अमरावतीच्या ऑनलाइन फसवणुकीत कोल्हापुरातील तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:51 IST2025-12-03T19:51:30+5:302025-12-03T19:51:56+5:30
कुलदीप सावरतकर याच्या बँक खात्यावर आले पाच लाख

अमरावतीच्या ऑनलाइन फसवणुकीत कोल्हापुरातील तरुणाला अटक
कोल्हापूर : अमरावती शहर सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात कोल्हापुरातील कुलदीप अशोक सावरतकर (वय ४०, रा. अहिल्याबाई होळकरनगर, फुलेवाडी रोड) याचा सहभाग स्पष्ट झाला. अमरावतीपोलिसांनी त्याला कोल्हापुरातून अटक केली. त्याच्या काश्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीची चौकशी सुरू आहे.
अमरावती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अमरावती येथील एका व्यक्तीची ७० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याबाबत ऑगस्ट २०२५मध्ये गुन्हा दाखल झाला. यातील पाच लाखांची रक्कम कोल्हापुरातील काश्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली होती. ती रक्कम पुढे अन्य काही खात्यांवर वर्ग झाली.
काश्वी ट्रेडिंगचा मालक कुलदीप सावरतकर असून, त्यानेच संबंधित रक्कम इतर खात्यांवर वर्ग केल्याची माहिती तपासातून समोर आली. त्यानुसार, अमरावती पोलिसांच्या पथकाने कोल्हापुरात येऊन त्याला अटक केली. या गुन्ह्यात विविध बँक खात्यांमधील ११ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. सावरतकरने फसवणूक केली असल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन अमरावती पोलिसांनी केले आहे.