कोल्हापूर : समाजकार्यासाठी कोल्हापुरचे सुभाष शेट्टी तब्बल ६९ वर्षे वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी धडपडतोय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:49 IST2018-09-28T12:31:53+5:302018-09-28T12:49:14+5:30
शासकीय किंवा खासगी नोकरी नाही..परंतू गेली तीस वर्ष बिनपगारी कोल्हापूर शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यामध्ये ते आपले आयुष्य खर्ची टाकत आहेत. रस्त्यावर भर ऊन्हात, पावसात शिट्टी फुंकून घसा कोरडा होत आहे आणि सतत पाण्यात उभारुन पायही रक्ताळलेले होतात.

कोल्हापूर : समाजकार्यासाठी कोल्हापुरचे सुभाष शेट्टी तब्बल ६९ वर्षे वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी धडपडतोय..
एकनाथ पाटील / कोल्हापूर : शासकीय किंवा खासगी नोकरी नाही..परंतू गेली तीस वर्ष बिनपगारी कोल्हापूर शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यामध्ये ते आपले आयुष्य खर्ची टाकत आहेत. रस्त्यावर भर ऊन्हात, पावसात शिट्टी फुंकून घसा कोरडा होत आहे आणि सतत पाण्यात उभारुन पायही रक्ताळलेले होतात. परंतू ते आजही थकलेले नाहीत. वयाचे ६९ वर्षातही त्यांचे हे समाजकार्य अखंडपणे सुरुच आहे. सुभाष शिवलिंग शेट्टी (रा. शाहुपूरी सातवी गल्ली, कोल्हापूर) यांचे कार्यावर टाकलेला ‘लोकमत’ने प्रकाशझोत..!
घरची गरीबी असणारे शेट्टी यांचे समाजकार्यासाठीच असे हे दातृत्व फार मोठ आहे. लग्नसमारंभापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत उपस्थित राहून विविध कामे न सांगता पार पाडणाऱ्या शेट्टींची ट्रॅफिक पोलिसाची भूमिका अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. घरात बसून आजारपण अंगाला लावून घेण्यापेक्षा शहरातील वाहतूक नियंत्रण, तुंबलेल्या गटारींची सफाई करणे, हातात खराटा घेऊन शाळा, पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करणे, अशी लहान-मोठी कामे तीही विनामोबदला ते करीत आहेत. त्यांची पत्नी चिमावती गतिमंद आहे. त्या आजारी असल्यामुळे अंथरुणावर खिळून असतात. शेट्टी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यातूनही त्यांची समाजकार्यांची धडपड कौतुकास्पद आहे. गेली तीस वर्ष ते स्वेच्छेने समाजकार्य करीत आहेत.
शहरात रस्ते अरुंद, वाढलेली वाहने त्यामुळे प्रत्येक चौकात वाहतूकींची कोंडी होत असते. वाहतून नियंत्रण शाखेचा पोलीस प्रत्येक चौकात उभा असतोच असे नाही. त्यामुळे ते शिट्टी घेऊन चौकात उभे राहून वाहतूकीला शिस्त लावतात. विजार शर्ट आणि गांधी टोपी घातलेला माणूस वाहतूक नियंत्रण करतो, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. वाहतूक शाखेच्या पोलीसांनी त्यांना ‘ट्रॅफिक वॉर्डन’ चा गणवेश दिला आहे. त्यामुळे ते गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सणात वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा देत समाजसेवेचे काम करतात. कोणताही मोबदला न घेता ते काम करीत आहेत. त्यांना मदतीसाठी कोणी पुढेही होत नाही.
घरी दोन वेळच्याजेवणाची मारामार आहे.
कारण पत्नी गतिमंद आहे. तिचीही सुश्रूशा त्यांनाच करावी लागते. एका बाजूला समाज सुधारण्याची तळमळ, जनजागृतीचा घेतलेला वसा तर दुसºया बाजूला कुटुंबाची जबाबदारी अशी दुहेरी कसरत सुभाष शेट्टी सांभाळत आाहे. तरीही कुणाकडे आर्थिक अडचणी या वैयक्तिक तक्रार नसते. हा त्यांचा मोठेपणा म्हणावा लागेल. जर अनेक दानशूर व्यक्ती तसेच समाजहित पाहणाºयांनी त्यांच्याकडे लक्ष दिले दर सुभाष यांना एक चांगला आधार मिळू शकतो.
पालकमंत्री घेणार का दखल
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा या ‘अवलियाची’ दखल घेवून आर्थिक मदत करावी, अशी कोल्हापूरवासीयांची मागणी आहे. जोपर्यंत अंगात ताकद आहे, तोपर्यंत समाजाची सेवा करायचीच, असा शेट्टी यांचा निर्धार आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये त्यांनी चांगली जबाबदारी पार पाडलेबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांचे कौतूक केले. कौतुकाची थाप शेट्टीच्या पाठिवर आहेच, परंतू त्यांना आज आर्थिक मदतीची गरज आहे.