कोल्हापूर : गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय तत्त्वे बनविण्यात शिवाजी विद्यापीठाचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 14:07 IST2017-12-23T14:00:00+5:302017-12-23T14:07:41+5:30
कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे व नव्या मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने भारताने युरोपियन युनियनसमवेत ‘इक्वाम-बाय’ हा संयुक्त सहकार्य प्रकल्प हाती घेतला आहे. यात शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे, अशी माहिती ‘नॅक’चे सल्लागार, या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे दिली.

कोल्हापूर : गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय तत्त्वे बनविण्यात शिवाजी विद्यापीठाचा सहभाग
कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे व नव्या मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने भारताने युरोपियन युनियनसमवेत ‘इक्वाम-बाय’ (एनहान्सिंग क्वालिटी अॅश्युरन्स मॅनेजमेंट अॅँड बेंचमार्किंग स्ट्रॅटेजीज इन इंडियन युनिव्हर्सिटीज) हा संयुक्त सहकार्य प्रकल्प हाती घेतला आहे. यात शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे, अशी माहिती ‘नॅक’चे सल्लागार, या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे दिली.
डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरांत भारतातील एकही शिक्षणसंस्था नाही. हे लक्षात घेऊन भारतीय उच्च शिक्षणाचे गुणवत्ता संवर्धन करण्याच्या दृष्टीने एशिया-पॅसिफिक क्वालिटी नेटवर्क या संस्थेचे अध्यक्षपद भूषवीत असताना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्था असलेल्या युरोपियन युनियनसमवेत चर्चा केली.
त्यातून युरोपियन युनियनच्या ‘इरॅस्मस प्लस’ या उपक्रमांतर्गत युरोपियन युनियन आणि भारत यांच्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनार्थ संवादाचा सेतू निर्माण करण्यासाठी संयुक्त प्रकल्प हाती घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, भारतातर्फे ‘नॅक’ने आणि युरोप युनियनतर्फे स्पेनच्या बार्सिलोना विद्यापीठाने समन्वयक संस्था म्हणून काम करण्याचे निश्चित झाले.
सात कोटी रुपयांच्या या त्रैवार्षिक प्रकल्पात युरोपियन युनियन आणि भारतातील निवडक नामवंत विद्यापीठे असून, यात शिवाजी विद्यापीठाचा समावेश केला आहे. या निवडीमागे शिवाजी विद्यापीठाने राबविलेले अभिनव उपक्रम महत्त्वाचे ठरले आहेत.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या प्रकल्पातील सहभागामुळे शिवाजी विद्यापीठ हे जागतिक शिक्षण क्षेत्राच्या नकाशावर आले असून, हा विद्यापीठाचा मोठा सन्मान आहे. या प्रकल्पात विद्यापीठ हे देशातील प्रादेशिक, ग्रामीण विद्यापीठांचे नेतृत्व करणार आहे.
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर. के. कामत हे या उपक्रमासाठी विद्यापीठीय समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आदी उपस्थित होते.
गुणवत्तेची कार्यप्रणाली होणार तयार
या प्रकल्पातील सर्व विद्यापीठे पुढील तीन वर्षे सर्व विद्यापीठीय व्यवस्थांचा अभ्यास करून एक सर्वंकष व सर्वसमावेशक स्वरूपाची कार्यप्रणाली (टुलकिट) तयार करणार आहेत. सहभागी विद्यापीठांनी आपापल्या प्रकारच्या विद्यापीठांची माहिती संकलित करण्यासाठी पुढाकार घ्यावयाचा आहे. शिवाजी विद्यापीठाने देशातील प्रादेशिक विद्यापीठांसमोरील आव्हाने, संधी, आदी स्वरूपांतील माहिती संकलित करावयाची असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
प्रकल्पातील सहभागी शैक्षणिक संस्था
या प्रकल्पात नॅशनल असेसमेंट अॅँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक), शिवाजी विद्यापीठ, जादवपूर युनिव्हर्सिटी (कोलकाता), सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (पुणे), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (चेन्नई), युनिव्हर्सिर्टी आॅफ म्हैसूर, एज्युलिंक प्रायव्हेट लिमिटेड (बंगलोर), मेंगलोर युनिव्हर्सिटी या भारतीय संस्था, तर युनिव्हर्सिटी दे बार्सिलोना स्पेन, नॅशनल एजन्सी फॉर क्वालिटी अॅश्युरन्स अॅँड अॅक्रिडिटेशन आॅफ स्पेन, कुंगलिगा टेक्निस्का होएगस्कोलन - केटीएच स्वीडन, युनिव्हर्सिर्टी देग्ली स्टडी दी रोमा ला सॅपिएंझा- युनिरोमा-वन इटली, युनिव्हर्सिर्टी दे माँटपेलीअर- यूएम- फ्रान्स, युनिव्हर्सिर्टी आॅफ निकोसिआ, यूएन- सायप्रस या युरोपियन संस्थांचा समावेश असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.