'कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर-सांगलीला महापूराचा धोका नाही'-अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 13:08 IST2021-07-27T13:08:11+5:302021-07-27T13:08:29+5:30
Ajit Pawar Kolhapur visit: अजित पवारांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला.

'कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर-सांगलीला महापूराचा धोका नाही'-अजित पवार
कोल्हापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, कोल्हापूर, सांगलीचा महापूर कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे येत नसल्याची माहिती अजित पवारांनी दिली. पाहणी केल्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पूरस्थितीवर भाष्य केलं.
यावेळी अजित पवार म्हणाले की, कर्नाटकात अलमट्टी धरण बनल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका वाढलाय, असे म्हटले जाते. पण, मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. pic.twitter.com/VBtF2HFdSq
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 27, 2021
दोन्ही राज्यांमध्ये समन्वय
तसेच, राधानगरी, दूधगंगा, वारणा असेल, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो. पण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा केलीये. धरणातील आवक आणि जावक याबाबत समन्वय ठेवला जातोय, असंही अजित पवार म्हणाले.
लवकर मदत जाहीर करू
पवार पुढे म्हणाले की, सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. लवकरच पंचनामे होतील आणि पिकांच्या नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेऊ. पण, जो पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यंत पॅकेज घोषणा करता येणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.