फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:06 IST2025-09-25T18:05:50+5:302025-09-25T18:06:14+5:30
पूरग्रस्तांना सध्या काय हवे.. वाचा

फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या वेळी महापुराचे संकट आले, त्या त्या वेळी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याने मिठाच्या पुड्यापासून ते कपड्यांपर्यंत सगळी मदत केली. जात, पात, धर्म अन प्रादेशिक अस्मितेच्या भिंती ढासळत माणुसकीसाठी धावलेली ही मदत कोल्हापूरकरांनी त्यांच्या हृदयात ठेवली. आज तोच मराठवाडा अन् सोलापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात अडकल्यानंतर कोल्हापूरकरांनी दातृत्वाची ओंजळ रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.
लोकप्रतिनिधींपासून सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विविध संघटनांनी मदतीचा ओघ सुरू केल्याने 'कोणती ना जात ज्यांची कोणती ना धर्म ज्यांना.. दुःख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना! मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना..’ या काव्यपंक्तीची प्रचिती कोल्हापूरकरांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २००५, २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरावेळी जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, कपडे व औषधी साहित्याची मदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे तिकडील शाळा, कॉलेजमधूनही पै-पै गोळा करून कोल्हापूरकरांना मदतीचा हात दिला होता. ती जाणीव ठेवून कोल्हापूरकरांनी आता त्याच मदतीचे पांग फेडण्यासाठी धाराशिव, बीड, जालना, परभणी, लातूर व सोलापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस म्हणते, आता हीच वेळ मदतीची
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना आवाहन केले आहे. किराणा सामान, प्रथमोपचारांचे साहित्य, पाणी बाटल्या, सॅनिटरी पॅड्स, शालेय साहित्य देऊन पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया. ही मदत येत्या २४ ते २८ सप्टेंबरपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीत जमा करण्यात येणार असून, ती २९ सप्टेंबरला ट्रकद्वारे पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे.
अमल महाडिक करणार मदत
कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनीही पूरग्रस्तांना मदतीचे पूर्ण किट देण्याची तयारी चालवली आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही मदत पाठवण्यात येणार आहे.
जिल्हा आपत्ती कक्षाला कॉल, आम्हाला मदत करायची आहे
मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी कोल्हापूरकरांकडून गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला जात आहे. मात्र, ही मदत सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातच स्वीकारली जात आहे.
पूरग्रस्तांना सध्या काय हवे..
पूरग्रस्तांचे अन्नधान्य व कपडे पूर्णपणे वाहून गेल्याने सध्या येथे साखर, तांदूळ, गहू, ज्वारी, मसाल्याचे पदार्थ यांसह अन्नधान्य व कपड्यांची नितांत गरज आहे. अनेक मुलांचे शैक्षणिक साहित्य महापुरात वाहून गेले आहे, भिजून खराब झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याचीही मागणी होत आहे.