कोल्हापूर रेल्वे स्थानक सजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:15+5:302021-01-21T04:22:15+5:30
कोल्हापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल उद्या, शुक्रवारी कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करणार ...

कोल्हापूर रेल्वे स्थानक सजले
कोल्हापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल उद्या, शुक्रवारी कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करणार आहेत. महाव्यवस्थापकांचा हा दौरा दीर्घ कालावधीनंतर होत आहे. यानिमित्त रेल्वेस्थानकास विद्युत राेषणाई, रंगरंगोटी, सजावट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच सातारा ते कोल्हापूर या मार्गावरील जुने झालेले पूल, त्यांची स्ट्रक्चरल स्थिती, रेल्वे मार्गावरील रुळांची तपासणी, मार्गात येणारे नदीपूल, स्थानकांची स्थिती, रेल्वे कार्यशाळा, प्रशासन, वाणिज्य, इलेक्ट्रीकल, अभियांत्रिकी, तांत्रिक, वैद्यकीय सुविधा, सिग्नल व्यवस्था, सुरक्षा, भांडार आदींची निरीक्षणअंतर्गत पाहणी करणार आहेत.
प्रामुख्याने सातारा, मिरज, कोल्हापूर या स्थानकांचा यात समावेश आहे. यानिमित्त कोल्हापूर रेल्वेस्थानकाची स्वच्छता, चार रेल्वे फ्लॅटफाॅर्मची रंगरंगोटी केली जात आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातील वन्यजीवांची चित्रे स्थानकाबाहेरील भिंतीवर रेखाटली जात आहेत. मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रेल्वे रुळांच्या खालील खडीकरण, सिमेंट खांब बदलणे आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. महाव्यवस्थापक मित्तल यांचा खात्याअंतर्गत दौरा असल्यामुळे मध्य रेल्वेच्या कोल्हापूर स्थानकाअंतर्गत यासाठी कोल्हापूर विभागातील चारशे कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून आपल्या विभागामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नयेत याकरीता रात्रंदिवस कार्यरत आहेत. मात्र, एकूण १४ रेल्वे गाड्यांपैकी केवळ कोयना, महाराष्ट्र एक्सप्रेस या दोनच गाड्या सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यातीलही सह्याद्री, सोलापूर, बंगलोर आणि हैदराबाद या रेल्वेगाड्या प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राणी चेन्नमा एक्सप्रेसही मिरज स्थानकातून सोडली जाणार आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूरच्या विकासाला मारक ठरेल असा निर्णय मध्य रेल्वे घेत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा. अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांतून व्यक्त आहे.
चौकट
वेगाची चाचणी
सातारा ते कोल्हापूर दरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर १५० किलोमीटर ताशी वेगाने रेल्वे अंतर पार करून वेगाची चाचणीही ते घेणार आहेत. त्यामुळे सातारा ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरील सर्वच प्रकारची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. तेरा डब्यांची विशेष रेल्वे शुक्रवारी कोल्हापूर स्थानकात दाखल होणार आहे. याची उत्सुकता रेल्वे कर्मचाऱ्यांना आहे.
प्रतिक्रीया
कोल्हापुरातून पुणे, मुंबई येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अन्य रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे खासदारांनी महाव्यवस्थापकांना जाब विचारावा.
-शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समिती,
(फोटो स्वतंत्र नसीर अत्तार देत आहेत)