ए. एस. ट्रेडर्सच्या संचालकाची ७० लाखांची कार जप्त, कोल्हापूर पोलिसांची पुण्यात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:11 IST2025-04-04T12:11:20+5:302025-04-04T12:11:42+5:30
लोकांचा पैसा अन् यांची मजा..

ए. एस. ट्रेडर्सच्या संचालकाची ७० लाखांची कार जप्त, कोल्हापूर पोलिसांची पुण्यात कारवाई
कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केलेल्या ए एस ट्रेडर्सचा संचालक विजय ज्योतिराम पाटील (रा. लाखे गल्ली, शिंदेवाडी- खुपिरे, ता. करवीर) याची ७० लाखांची जॅग्वार ही अलिशान कार कोल्हापूरपोलिसांनी पुण्यातून जप्त केली. गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शाहूपुरी येथील ए एस ट्रेडर्स व त्यांच्या इतर उपकंपन्यांचे पदाधिकारी, संचालक, एजंटांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, मुंबईसह कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणच्या शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास सांगून गंडा घालून कंपन्या बंद केल्या. याप्रकरणी सन २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत मुख्य संशयितासह १६ जणांना अटक झाली आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असताना कंपनीचा संचालक विजय पाटील याची अलिशान कार पुण्यात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सखोल तपास केला. पुण्यातील सिल्वर गुडस, कंडोमनियम सोसायटी, पिंगळे वस्ती, मुंढवा येथे पाटील याची अलिशान जॅग्वार कार (एमएच ०९- एफएक्स ४६५४) मिळाली. कायदेशीर प्रक्रिया करून ती कार जप्त केली. जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विजय काळे, राजू येडगे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.
लोकांचा पैसा अन् यांची मजा..
यापूर्वी एक एप्रिलला एजंट अमित अरुण शिंदे (रा.लिशा हॉटेलजवळ कोल्हापूर) याची ६० लाखाची अलिशान कार पुण्यातून जप्त करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीच्या नावे ही कार नोंद होती. लोकांचा पैसा आणि त्यावर एजंट, संचालक महागड्या कार, फ्लॅट, दागिने घेऊन मजा मारत होते. आपल्याला कोण काही करू शकत नाही असा त्यांचा आविर्भाव होता. परंतु पोलिसांनी आता एकेकाच्या नाड्या आवळायला सुरू केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.