कोल्हापूर : शेकडो चाव्यांचा जुडगा त्याच्याकडे आहे. गाडीचा प्रकार पाहून तो बनावट चावी काढून दुचाकी, चारचाकी वाहने चोरायचा. असे एक, दोन नव्हे तर तब्बल वाहनचोरीचे आणि अन्य असे एकूण १२० गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा नागेश हणमंत शिंदे (वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून विविध जिल्ह्यांत चोरी केलेली एक दुचाकी, पिकअप आणि चारचाकी असा ८ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.जिल्ह्यात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणि गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी तपास पथके तयार केली. त्यात उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील अमलदार वैभव पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार नागेश शिंदे हा राजारामपुरीत चोरी केलेल्या दुचाकीच्या विक्रीसाठी गोकुळ शिरगाव कमानीजवळ येणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता दुचाकी राजारामपुरी नववी गल्ली येथून चोरल्याचे सांगितले. पंढरपूर येथून पिकअप गाडी आणि सांगोला येथून चारचाकीची चोरल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी एलसीबीने राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे हजर केले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक कळमकर, निरीक्षक संतोष गळवे, अमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, हिंदुराव केसरे, प्रदीप पाटील, अरविंद पाटील, संतोष बरगे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, सचिन जाधव यांनी केली.
हँडल लॉक तोडण्यात पटाईतगुन्हा दाखल झालेल्या शिंदे सहा महिन्यांपूर्वी सात कार चोरी प्रकरणात पोलिसांना सापडला होता. गेल्या सहा वर्षांपासून तो वाहनचोरी करतो. दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यात तो सराईत आहे. चोरलेली वाहने तो कर्नाटकात विक्री करत होता.
कर्नाटकचे एजंट रडारवरशिंदे याने काही वाहनांचे सुटे पार्टही केले आहेत. चांगली किंमत मिळत असलेल्या वाहनांची विक्री त्याने कर्नाटकात केली आहे. ज्या एजंटानी दुचाकी, चारचाकी विक्री केली आहे. ते एजंट कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याचा तपास सुरू केला आहे.
कोल्हापूरसह, सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्यागेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि परिसरात तो वाहनचोरी करतो. ही चोरी करताना त्याने परिसरात जाऊन रेकी केली. हा गुन्हा करताना तो एकटाच होता, असे पोलिसांनी सांगितले.