कोल्हापूर पोलिस प्रशासनाकडून चोरीचा कोटीचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:45 IST2026-01-03T13:45:26+5:302026-01-03T13:45:52+5:30
वर्धापन दिनानिमित्त सोन्या-चांदीचे दागिने, मोटारसायकली परत

कोल्हापूर पोलिस प्रशासनाकडून चोरीचा कोटीचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
कोल्हापूर : पोलिस वर्धापन दिनानिमित्त पोलिस प्रशासनाकडून गुरूवारी आयोजित कार्यक्रमात १ कोटी ७ लाख ३७ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालक, फिर्यादींना देण्यात आला. पोलिस दलाच्या अलंकार हॉल समोरील मैदानावर कार्यक्रम झाला. जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला २ जानेवारी १९६१ साली पोलिस ध्वज प्रदान केला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कार्यक्रम झाला. घरफोडी, चोरी झाल्यानंतर अनेकांना आपला मुद्देमाल परत मिळणार की नाही, मिळाला तर कधी मिळणार, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. काहीजण चोरीची फिर्याद देण्यासही वेळेत जात नाहीत. पोलिसांकडून सहकार्य मिळेल की नाही, अशी त्यांना शंका वाटत असते.
मात्र पोलिस प्रशासनाने चोरीची फिर्याद आल्यानंतर नियोजनबद्ध तपास मोहीम राबवितात. चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करतात. घरफोडीच्या १२ गुन्ह्यांतील ६५१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१६ ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण ९१ लाख ७५ हजार ८३२ रुपये किमतीचे दागिने, २८ मोटारसायकली, १२ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ कोटी ७ लाख ३७ हजार ८३२ रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित गुन्ह्यातील फिर्यादींना देण्यात आला. यावेळी अनेक फिर्यादींना मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर लपवता आला नाही. पोलिस प्रशासनाचे आभारही त्यांनी मानले.
कार्यक्रमास उपअधीक्षक तानाजी सावंत, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी आरांक्षा यादव, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
चोरीची तक्रारी द्या...
कोणत्याही प्रकारची चोरी अथवा अनुचित प्रकार घडल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात जावून तातडीने आपल्या तक्रारी नोंद करावी, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार यांनी आपल्या भाषणातून केले.
काय दिले परत..?
- घरफोडीच्या १२ गुन्ह्यांतील : ६५१ ग्रॅम सोन्याचे दागिने
- चांदीचे दागिने : २१६ ग्रॅम
- २८ मोटारसायकली : २८
- मोबाईल हॅन्डसेट : १२