कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: प्रतिगामी शक्तींना कोल्हापूरकर विरोध करतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 10:10 IST2022-04-09T12:54:50+5:302022-04-16T10:10:30+5:30
आता एक नेता उठला आणि भोंगे वाजवायचे बंद करा, म्हटल्यावर भाजपची मंडळी लगेच मागणी करू लागली. सत्तेत असताना पाच वर्षे काय झोपा काढल्या होत्या का?

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: प्रतिगामी शक्तींना कोल्हापूरकर विरोध करतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास
कोल्हापूर : धर्मा-धर्मात फूट पाडणाऱ्या, जाती-जातीमध्ये भांडणे लावणाऱ्या, आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि दंगली पेटविणाऱ्या प्रतिगामी शक्तींच्या मागे माझे कोल्हापूरकर कधीच जाणार नाहीत, अशा शक्तीला विरोध करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राजारामपुरी येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी भर पावसात भाजपवर जोरदार हल्ला चढविला. अजित पवार म्हणाले, पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर आली. कोरोनाच्या संकटातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला खीळ बसू दिली नाही.
कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावत असताना दुर्दैवाने चंद्रकांत जाधव आपल्यातून गेले. त्यांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी जयश्री जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. राजेश क्षीरसागर यांना थांबावे लागले असले तरी, तो नेतृत्वाचा निर्णय होता. उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व बळकट करण्याबरोबरच त्यांच्या विचाराचा आमदार विधिमंडळात पाठविण्यासाठी जिवाचे रान करा. खोट्या प्रचाराला बळी पडू नका.
बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस महात्मा गांधी घरा-घरात पोहोचविणार अशी टीका चंद्रकांत पाटील करत आहेत. त्यांच्या बुध्दीची कीव येते. होय, आम्ही गांधीजींचे विचार घरा-घरात पोहोचवणार आहोत. आम्ही त्याच्याशी बांधील आहोत. तुम्ही गोडसेच्या विचाराचे बांधील असल्याने अशी भाषा येत आहे.
या मंडळींना सत्ता सोडवत नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे. त्यामुळे या विचाराला कोल्हापूरची जनता कधीही थारा देणार नाही. चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजयी करा.
शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार करत आहे. महागाई वाढविण्याचा ठेका घेतलेल्या भाजपला कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत विसर्जित करा. मुंबई बँक लुटलेले लोक येथे येऊन हिंदुत्वाबाबत बोलत आहेत. जयश्री जाधव नव्हे, तर उध्दव ठाकरे हेच उमेदवार म्हणून मतदान करा.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, राजेश पाटील, वैभव नाईक, राजू आवळे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, जयश्री जाधव, अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, रोहित आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.
काश्मीर फाईलने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार का?
भाजपची मंडळी देशातील तरुणांना काश्मीर फाईल दाखवत आहेत. मात्र यामुळे गोरगरिबांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? या रस्त्यांना आपणाला जाऊन चालणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पाच वर्षे झोपा काढल्या का?
आता एक नेता उठला आणि भोंगे वाजवायचे बंद करा, म्हटल्यावर भाजपची मंडळी लगेच मागणी करू लागली. सत्तेत असताना पाच वर्षे काय झोपा काढल्या होत्या का? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आहे. सगळे सण उत्साहाने साजरे करायचे, ही शाहू, फुले आंबेडकरांची शिकवण असल्याचे पवार यांनी सांगितले.
महाडिकांची भाषा बदलली
महिलांबद्दल अपशब्द वापरला जातो, विरोधकांची प्रचाराची पातळी घसरली आहे. आपण धनंजय महाडिक यांना जवळून ओळखतो. भाजपमध्ये गेल्यापासून त्यांची भाषा बदलल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.
प्रा. जयंत पाटील यांना ‘ईडी’ लावा
जयंती नाल्यावर भराव टाकून इमारती उभ्या केल्याने कोल्हापूरकर महापुरात सापडले. त्यातून वाचविण्यासाठी परवापर्यंत नेत्यांच्या पाया पडणारे प्रा. जयंत पाटील यांच्यावरच ईडीची कारवाई केली, तर डोळे पांढरे होतील, अशी टीका भारती पाेवार यांनी केली.
(छाया - नसीर अत्तार)