कोल्हापूर बाजार समिती शहरातील मॉलकडूनही वसूल करणार सेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:24 IST2025-08-12T19:24:09+5:302025-08-12T19:24:30+5:30
बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी धडाका लावला

कोल्हापूर बाजार समिती शहरातील मॉलकडूनही वसूल करणार सेस
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी सेस वसुलीचा धडाका लावला आहे. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेकडील व शहराच्या मध्यवस्तीत एका कंपनीचे दोन मॉल आहेत. संबंधित मॉलकडून समितीने सेसची मागणी केली आहे.
या मॉलचे जयसिंगपूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गोडावून असल्याने ते त्यांना सेस देतात, मात्र विक्री कोल्हापुरात आणि सेस जयसिंगपूर समितीला कसा? त्यामुळे किमान ५० टक्के सेस कोल्हापूर बाजार समितीला द्यावा, अशी मागणी समिती प्रशासनाने केली आहे.
महाराष्ट्रात या मॉलच्या शाखा सुरु आहेत. या मॉलचे गोडावून निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे आहे. तेथून १० टक्केच मालाची विक्री होते, मात्र महिन्याला दहा लाखांचा सेस जयसिंगपूर बाजार समितीला भरतात. यावर, कोल्हापूर बाजार समितीने हरकत घेतली असून, त्यातील ५० टक्के सेस येथे भरावा, असा तगादा लावला आहे.
कागल उपबाजाराच्या ठिकाणी ‘मॉल’चा प्रस्ताव
समितीचे उत्पन्न वाढीसाठी कागल येथील उपबाजार आवारात संबंधित मॉलला गोडावून बांधून देण्याची तयारी समिती प्रशासनाने केली आहे. त्याचबरोबर तिथेच मॉल उभा केला तर भाड्याने जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्तावही दिला आहे.
शहरात एका कंपनीचे दोन मॉल आहेत. पण, ते सेस जयसिंगपूर समितीला देतात. त्यांनी किमान ५० टक्के सेस कोल्हापूर बाजार समितीला द्यावा, अशी सूचना केली आहे. - सूर्यकांत पाटील (सभापती, बाजार समिती)