कोल्हापूर बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:41 IST2026-03-24T11:41:14+5:302026-03-24T11:41:47+5:30
अधिकाऱ्याची नेमणूक दोन दिवसांत

कोल्हापूर बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांचा राजीनामा
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील (बाचणी) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याकडे दिला. येत्या दोन दिवसांत नवीन सभापती निवडीबाबत प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे.
सभापतिपद हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे होते. पाटील यांनी आठ महिन्यांतच राजीनामा दिल्याने उर्वरित कालावधीसाठी त्याच पक्षाच्या संचालकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पाटील यांची जुलै २०२५ मध्ये सभापती म्हणून निवड झाली होती. पण, गेल्या आठ महिन्यांत संचालक मंडळात अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यांच्या विरोधात नेत्यांकडे तक्रारी गेल्या होत्या.
त्यातून त्यांनी १४ मार्चला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐकून न घेता आपणास बोलल्याचे सांगत सभापतिपदासह समिती संचालक, संताजी घोरपडे साखर कारखाना व स्थानिक संस्थांच्या सर्व पदांचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर तब्बल दहा दिवसांनी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला.
नवीन सभापती निवडीसाठी दोन दिवसांत प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक शेखर देसाई व मेघा देसाई तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे समर्थक संदीप वरांडेकर तर जनसुराज्य पक्षाकडूनही शंकर पाटील (बारगीरकर) यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
संचालकपदाचा राजीनामा कधी?
सूर्यकांत पाटील यांनी सभापतिपदाच्या राजीनाम्याची घाेषणा करताना संचालकपदाचाही राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सोमवारी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यांना संचालकपदाचा राजीनामा द्यायचा असल्यास ते नवीन सभापतींकडे देऊ शकतात.
प्रस्तावास अखेर मंजुरी
बाजार समितीने सुरक्षारक्षकांची १५ पदे रद्द करून कनिष्ठ लिपिक पदे वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी सभापतिपदाचा राजीनामा सोमवारी दिला आहे. नवीन निवडीबाबत दोन दिवसांत प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. - नीलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर