कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा, सर्किट बेंचमुळे गरज वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:36 IST2025-08-13T12:35:45+5:302025-08-13T12:36:14+5:30
सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवावी लागणार

संग्रहित छाया
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच सुरू होत असल्याने कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास मनुष्यबळाची गरज आहे. यातच मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यात १५ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोल्हापूरसाठी वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पोलिस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह किमान ५०० पोलिस अधिकचे मिळू शकतात.
जिल्हा पोलिस दलात सध्या सुमारे तीन हजार पोलिस कार्यरत आहेत. ३१ पोलिस ठाणी, पोलिस मुख्यालयातील विविध शाखा, विभाग, विमानतळ आणि महामार्ग सुरक्षेचा भार पोलिसांवर आहे. मंजूर पदांपैकी २० टक्के कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे. शिवाय अलीकडच्या काळात जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, शहरांचा वाढता विस्तार, उद्योगधंदे यांचा विचार करता पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे.
सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवावी लागणार आहे. पोलिस आयुक्तालय आणि लोकसंख्येनुसार नव्याने आकृतिबंध तयार केल्यास जिल्ह्यासाठी एकूण साडेचार हजार पोलिसांची आवश्यकता असल्याचे लक्षात येईल. पालकमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी याचा पाठपुरावा केल्यास जादा मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
नवीन भरतीमुळे आशा पल्लवित
कोल्हापूर पोलिस दलात जून २०२४ मध्ये २१३ जागांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. आता सरकारने १५ हजार जागांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे कोल्हापूरसाठीही काही जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्किट बेंच आणि पोलिस आयुक्तालय विचारात घेऊन कोल्हापुरातील भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.