पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:08 IST2025-10-06T19:08:55+5:302025-10-06T19:08:55+5:30
गत निवडणुकीत १४ जागा जिंकल्या होत्या

पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
गडहिंग्लज : जिल्हा मजूर संघाच्या उपाध्यक्ष पदासह संचालकपदाचा राजीनामा देण्याच्या सूचनेचे पालन न करता पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे लक्ष्मण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, २०२२ मध्ये तत्कालीन खासदार संजय मंडलिक, तत्कालीन आमदार प्रकाश आबिटकर, स्वत: मी व जिल्ह्यातील नेत्यांनी मिळून जिल्हा मजूर संघाची निवडणूक लढविली. त्याला सभासदांकडून चांगला प्रतिसाद मिळून १५ पैकी १४ जागा आपल्या पॅनेलने जिंकल्या.
निवडणुकीनंतर संस्थेच्या अध्यक्षपदी प्रमोद पवार यांची, तर उपाध्यक्षपदी तोडकर यांची बिनविरोध निवड झाली. परंतु, अलीकडे संस्थेतील कारभाराच्या विरोधात संचालकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. संचालकपदाचे राजीनामे देऊन १० संचालकांनी संस्थेवर प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ व कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार तोडकर यांनीही राजीनामा द्यावा, अशी सूचना पक्षाने त्यांना केली. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळही दिला. परंतु, त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यांचे वागणे पक्षशिस्तीच्या चौकटीत बसत नसल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.