ऑक्टोबर हिट नाय.. पावसामुळं झालं गारगीठ; कोल्हापूर जिल्ह्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:52 IST2025-10-28T16:51:46+5:302025-10-28T16:52:34+5:30
पावसाने नागरिकांबरोबर पिकेही गारठली, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

ऑक्टोबर हिट नाय.. पावसामुळं झालं गारगीठ; कोल्हापूर जिल्ह्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’
कोल्हापूर : ऑक्टोबर महिना म्हटले की अंग भाजणारे ऊन, अंगाकडून घामाच्या धारा वाहतात, असा काहीसा अनुभव प्रत्येक वर्षी येतो. मात्र, यंदा ऑक्टोबर महिना संपला तरी ‘कसली हिट’ येथे पावसाच्या गारठ्याने शेकोट्या पेटवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पावसाने नागरिकांबरोबर पिकेही गारठली आहेत. त्याचा परिणाम शेती कामावर झाला असून ढगाळ पावसाळी वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. आणखी दोन दिवस हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली, गेली पाच-सव्वा पाच महिने पाऊस आहे. या पावसाचा फटका सर्वच घटकांना बसला आहे. सततच्या पावसाने नागरिक गारठले आहेतच, त्याचबरोबर पिकांच्या वाढीवरही परिणाम झालेला आहे. साधारणता आपल्याकडे जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस राहतो. सप्टेंबर महिन्यापासूनच पावसाची उघडझाप सुरू राहते आणि हीच उघडझाप पिकांच्या वाढीला पोषक ठरते.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात एकदम उष्णता वाढते, तापमान ४० डिग्रीपर्यंत पाेहचते. या महिन्यातील उन्हाने अंग भाजून निघते. रस्त्यावरून चालताना उष्णतेच्या वाफा अंगावर आल्याने शरीराची लाही लाही होते. अखंड महिना कडक उन्हाचा गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात होते.
मात्र, यावर्षी निसर्गाच्या मनात काही वेगळेच दिसत आहे. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपत आला तरी थांबण्याचे नाव घेत नाही. यंदा ऑक्टोबर हिटचा अनुभव कोल्हापूरकरांना आलाच नाही.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १०.२ मिली मीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी, करवीर, कागल, भुदरगड, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने साठ्यात वाढ झाली आहे.
किडीला पोषक...
सध्याचे ढगाळ व पावसाळी हवामान किडीला पोषक असेच आहे. भात, भुईमुगाची काढणी थांबली आहे. भात काढणीस उशीर झाल्याने ते जमिनीवर पडल्याने त्याला कोंब येऊ लागले आहेत. बुरशीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हवेत कमालाची गारठा
पावसाबरोबर जोराचे वारे वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. झडीच्या पावसात जसा गारठा असतो तसे वातावरण झाल्याने अंगातून थंडी जात नाही.