कोल्हापुरातील कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:39 IST2023-02-25T15:38:21+5:302023-02-25T15:39:04+5:30

तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा

Kalamba Lake in Kolhapur under pollution; Sewage, chemically contaminated water in ponds | कोल्हापुरातील कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी तलावात

कोल्हापुरातील कळंबा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाणी, मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी तलावात

अमर पाटील

कळंबा : १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा कळंबा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून पाणी हिरवट पडले असून पाण्याचा उग्र वास येत आहे. तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, कपडे धुणे निर्माल्य टाकणे यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे.

पालिका मालकीच्या कळंबा तलावाच्या हद्दीतील २० एकरात अतिक्रमण करत शेतकऱ्यांनी शेती सुरू केली असून शेतातील रसायनयुक्त पाणी पावसाळ्यात झिरपून तलावात मिसळत आहे. त्यामुळे तलावात रोज प्रदूषणाची भर पडत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या ऑपरेटिंग झु ट्रस्टने कुळांना कसायला दिलेल्या कात्यायनी पार्कातील जमिनीवर बेकायदेशीर नागरी वस्त्या निर्माण झाल्या असून शौचालये नसल्याने नैसर्गिक ओढ्याचा वापर शौचालयासाठी केला जात आहे. याचे मैलामिश्रित पाणी थेट तलावात मिसळते. 

तलाव देखभालीसाठी पालिकेचा कर्मचारी नियुक्त नसल्याने तलाव परिसर मद्यपी जेवणावळीचा अड्डा बनला असून याचा घनकचरा थेट तलाव पात्रात टाकला जातो. तलाव परिसरात सायलेंट नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर हॉटेल्सचा गराडा पडला असून याचाही कचरा तलावात टाकला जातो.

परिणामी पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढून विषारी जलपर्णी फोफावत आहेत. तलावातील प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रचंड नाहक खर्च होत आहे तरीही पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने आता प्रदूषणमुक्तीसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२० लाख पाण्यात

तलावाजवळ २० लाखांचा चुराडा करून जनावरे धुण्यासाठी हौद बांधण्यात आला आला. मात्र, हौदात पाणीच नसल्याने जनावरे थेट तलावात सोडली जातात. तर हौद कचरा साठवण्याचा अड्डा बनला आहे.

तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. -अरुण पाटील, सुर्वेनगर
 

Web Title: Kalamba Lake in Kolhapur under pollution; Sewage, chemically contaminated water in ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.