Kolhapur ZP Election 2026: अध्यक्षपद कागल की गडहिंग्लजला?, राजकीय वर्तुळात उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:31 IST2026-02-11T18:31:28+5:302026-02-11T18:31:53+5:30
कागलला द्यायचे तर...

Kolhapur ZP Election 2026: अध्यक्षपद कागल की गडहिंग्लजला?, राजकीय वर्तुळात उत्सुकता
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातच ठेवण्याची दाट शक्यता आहे. हे पद फक्त कागल तालुक्याला जाणार की गडहिंग्लज तालुक्याला याची आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आतापर्यंत कागलला एकदाच अध्यक्षपद मिळाले असून गडहिंग्लज हा मोठा तालुका असूनही या तालुक्याला अजूनही अध्यक्षपद मिळालेले नाही.
या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे ६८ पैकी २० जागा पटकावल्या आहेत. महायुतीच्या ५१ जागांपैकी जवळपास ४० टक्के जागा या एकट्या राष्ट्रवादीने पटकावल्या आहेत. त्यामुळे साहजिकच अध्यक्षपदावर राष्ट्रवादी दावा करणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अशा बाबतीत मुश्रीफ कधीही ते म्हणतात त्याप्रमाणे भाबडेपणाने वागत नाहीत. कोणत्याही नियुक्तीबाबत किंवा निवडीबाबत ते झोपेतसुद्धा पहिल्यांदा कागल विधानसभा मतदारसंघातीलच नाव घेतात असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
वाचा: कोरेंनी डिवचले, हसन मुश्रीफ यांनी उट्टे काढले; राष्ट्रवादीची पन्हाळा, शाहूवाडीत मुसंडी
राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या २० जागांपैकी ११ महिला आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. अर्थात सर्वसाधारण महिला म्हटल्यानंतर या जागेवर कोणत्याही प्रवर्गातील महिला काम करू शकते. त्यामुळे मग रेखा मुगडे, सुवर्णा कांबळे, शोभाताई फराकटे, शिल्पा खोत, शैलजा पाटील, मानसी भोगण, विद्या पाटील, रचना गावडे, पूजा पाटील, अमृता डोंगळे आणि राजकुंवर गायकवाड या सर्वांपैकी कुणालाही संधी दिली तर ती कोणीच नाकारणार नाही.
परंतु यामध्ये काही महिला पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. काही दुसऱ्यांदाही निवडून आल्या आहेत. यातील नावे वजनदारही आहेत. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी नाव निवडताना मुश्रीफ यांचीही कसोटी लागण्याची शक्यता आहे. शाहूवाडी तालुक्यातील राजकुंवर गायकवाड आणि अमृता डोंगळे यांच्यासाठीही मुश्रीफ यांच्यावर दबाव येऊ शकतो.
गडहिंग्लजला अद्याप एकदाही पद नाही
१९६२ साली जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून गडहिंग्लज तालुक्याला अध्यक्षपद मिळालेले नाही. गडहिंग्लजपेक्षाही तुलनेत लहान असलेल्या गगनबावडा, आजरा तालुक्याला हे पद मिळाले. परंतु गडहिंग्लज या पदापासून वंचित आहे. तसेच गिजवण्याचे सतीश पाटील हे मुश्रीफ यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्या पत्नी शैलजा पाटील यांना संधी असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
कागलला द्यायचे तर...
कागल तालुक्यातून शोभाताई फराकटे, सुवर्णा कांबळे आणि शिल्पा शशिकांत खोत या सदस्या आहेत. यातील सध्या फराकटे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांचे दिवंगत पती गणपतराव फराकटे आणि मुश्रीफ यांचे निकटचे संबंध, त्यांचा मुलगा, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी जिल्हा परिषदेत पाच वर्षे केलेले काम या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.