कागल नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडेच, समरजित घाटगे 'तुतारी' ऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:49 IST2025-11-18T18:48:07+5:302025-11-18T18:49:19+5:30
Local Body Election: राजकीय समीकरण बदलले : मंडलिक, संजय घाटगे यांना धक्का

कागल नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडेच, समरजित घाटगे 'तुतारी' ऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार
कागल : कागल नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या उलथापालथी होत गेल्या. दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष करीत असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे एकत्र आले आहेत. मंत्री मुश्रीफ यांना नगराध्यक्षपद व तेरा जागा, तर समरजित घाटगे यांना उपनगराध्यक्ष व दहा जागा असे सत्तावाटपाचे सूत्र ठरल्याचे समजते.
नगराध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांच्या पत्नी सविता माने यांना युतीच्या वतीने निश्चित केले आहे. समरजित घाटगे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हाऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.
या दोघांच्या युतीविरुद्ध प्रा. संजय मंडलिक (शिवसेना शिंदे) गट लढणार आहे. या प्रक्रियेत माजी आमदार संजय घाटगे गटाला डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले, तर शिवसेना (उबाठा) व राष्ट्रीय काँग्रेस यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कायम आहेत. अपक्ष उमेदवारांचेही अर्ज आहेत. मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील या युतीने शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. कागल नगरपालिका आवारात मंत्री मुश्रीफ व राजे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी भय्या माने यांच्या निवासस्थानी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेथे गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, भय्या माने यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
गेली आठवडाभर चर्चा
गेली आठवडाभर या युतीची चर्चा सुरू होती. समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि चारही नेते मिळून महायुती करतील अशी चर्चा होती. मात्र दुसऱ्या बाजूला मंत्री मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे एकत्र येणार व विरोधात समरजित घाटगे व संजय मंडलिक लढणार असे चित्र समोर येत होते. तशी बोलणीही झाली होती. मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी आपल्यामध्ये अशी युती होणार नसल्याचेच स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे कार्यकर्ते व प्रमुख नेतेही या घडामोडीपासून अनभिज्ञ होते.
इच्छुकांची घालमेल
अनेकांच्या चेहऱ्यावर या युतीने आश्चर्याचे भाव उमटले होते. सकाळपासून जो तो माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होता. उमेदवारीचा शब्द मिळालेल्या कार्यकर्त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी घालमेल सुरू होती.
मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार?
मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात युती घडविण्यासाठी मुंबईत चर्चा झाल्या व त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू आहे. दुपारी १२ वाजता संजय घाटगे कागलमधील एका संस्थेत आले. तेथे प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करीत असतांना त्यांना भाजप वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. त्यानुसार त्यांच्याकडे असलेले भाजपचे एबी फाॅर्म परत घेण्यात आले. मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे मंगळवारी (दि. १८) कागलमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत.
इतर पक्षांचे उमेदवार
संजय मंडलिक गटाने दुपारी शिवसेना शिंदे गटाकडून सर्व जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना उबाठाच्या वतीने दहा जागी नगरसेवक पदासाठी, तर एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आहे. काँगेसच्या वतीने सहाजागी नगरसेवकपदाचे, तर एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे.