Navratri2022: 'चांगभलं'च्या गजरात पार पडला 'जोतिबाचा पालखी सोहळा', कृष्ण रूपात बांधली आजची महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:28 IST2022-10-04T14:10:43+5:302022-10-04T14:28:08+5:30
ढोल, तुतारी, डवर, कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला

Navratri2022: 'चांगभलं'च्या गजरात पार पडला 'जोतिबाचा पालखी सोहळा', कृष्ण रूपात बांधली आजची महापूजा
दत्तात्रय धडेल
जोतिबा : गुलाल खोबऱ्याची उधळण, चांगभलंचा गजर, पोलीस बँडची धुन अशा उत्साही अन् भक्तीमय वातावरणात जोतिबा डोंगरावरील आजचा पालखी सोहळा पार पडला. खंडेनवमीनिमित्त दिवे ओवाळणी, शस्त्र पुजन, घट उठविणचा विधी संपन्न झाला. आजच्या दिवशी जोतिबाची श्री कृष्ण रूपात महापूजा बांधण्यात आली होती.
खंडेनवमी निमित आज, मंगळवारी सकाळी ९ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देव सेवकाच्या लवाजम्यासह श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाला. पालखी सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलंचा गजर केला. पोलीस बँडची धुन लक्षवेधी ठरली. ढोल, तुतारी, डवर, कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. ढोलीची झुलवे, डवरीची डवरी गीते, म्हालदाराची ललकारी झाली. पालखी समवेत श्रीचे मुख्य पुजारी, मानाचे समस्त दहा गावकर, देव सेवक, जोतिबा देवस्थान समितीचे प्रभारी दिपक म्हेत्तर, सरपंच राधा बुणे उपस्थित होते.
तोफेची सलामी होताचा पालखी सोहळ्याची सांगता झाली. सकाळी १० वाजता धुपारती सोहळ्याने जोतिबा, यमाई, तुकाई, भाव काई मंदिरातील घट उठविण्याचा विधी झाला. सडा रांगोली, पाय पुजनाने धुपारतीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी दुध वाटप केले. शस्त्र पुजन करण्यात. कर्पुरेश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला. दुपारी १. ३० वाजता परत जोतिबा मंदिरात धुपारतीची सांगता तोफेच्या सलामीने झाली. अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली.