कोल्हापूर : मुंबईतील बोरीवली ते कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोड या प्रवासादरम्यान महिलेच्या हँडबॅगेतील सात तोळ्यांचे दागिने चोरीला गेले. हा प्रकार गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरच्या सकाळी निदर्शनास आला. याबाबत भूमिका मयूर पाष्टे (वय २९, रा. बोरीवली ईस्ट, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. १४) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.फिर्यादी पाष्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या २७ सप्टेंबरच्या रात्री कुटुंबीयांसह खासगी ट्रॅव्हल्समधून कोल्हापूरला निघाल्या. भाऊसिंगजी रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबल्यानंतर त्यांना हँडबॅगेत प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये आणि इतर बॅगांमध्ये शोध घेतला. दागिने घरात विसरले असतील अशी शंका आल्याने परत गेल्यानंतर घरात शोध घेतला. मात्र, दागिने सापडले नाहीत. अखेर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.दोन डब्यांमध्ये साडेचार लाखांचे दागिनेपाष्टे यांनी प्लास्टिकच्या दोन डब्यांमध्ये दागिने ठेवून ते डबे हँडबॅगेत ठेवले होते. त्यात चार तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याचे कानातील टॉप्स आणि एक तोळ्याचे झुमके असे साडेचार लाखांचे दागिने होते. प्रवासात दागिने सुरक्षित राहावेत यासाठी त्यांनी बॅगेत ठेवले होते. मात्र, बॅगेतील दागिन्यांचे डबे चोरीला गेल्याने त्यांना धक्का बसला.
हँडबॅगेत सात तोळे दागिने ठेवले, प्रवासात चोरीला गेले; मुंबई ते कोल्हापूर दरम्यान घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:25 IST