TET paper leak case: ॲकॅडमीचालक, शिक्षकांचेच रॅकेट; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता
By उद्धव गोडसे | Updated: November 25, 2025 11:53 IST2025-11-25T11:53:21+5:302025-11-25T11:53:38+5:30
कोट्यवधींची उलाढाल

TET paper leak case: ॲकॅडमीचालक, शिक्षकांचेच रॅकेट; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता
उद्धव गोडसे
कोल्हापूर : टीईटी परीक्षेचा पेपर आधीच फोडून तो परीक्षार्थींपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणारे रॅकेट काही ॲकॅडमीचालक आणि शिक्षकांनीच चालवल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर पोलिसांनी रविवारी (दि. २३) अटक केलेल्या आरोपींमध्ये चार शिक्षक आणि तीन ॲकॅडमीच्या चालकांचा समावेश आहे. या गुन्ह्यात शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे याचे धागेदोरे कुठपर्यंत जाणार याची चर्चा राज्यातील शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील बेलवाडी (ता. कराड) येथे निवृत्त जवान संदीप भगवान गायकवाड याने १५ वर्षांपूर्वी गावातच जय हनुमान करिअर ॲकॅडमी सुरू केली. या ॲकॅडमीत सैन्य भरती, पोलिस भरती, वन विभागातील कर्मचारी, अधिकारी भरती यांसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. निवृत्त जवान संदीप आणि त्याचा लहान भाऊ महेश गायकवाड हे दोघे ॲकॅडमी चालवतात. हेच टीईटी आणि सेट परीक्षेचे पेपर फोडून पुढे एजंटमार्फत परीक्षार्थींपर्यंत पोहोचवत होते.
गडहिंग्लज तालुक्यातील राहुल अनिल पाटील (रा. शिंदेवाडी) आणि कागल तालुक्यातील दयानंद भैरू साळवी (रा. तमनाकवाडा) यांच्याही ॲकॅडमी आहेत. साळवी याची पत्नी गावात सरपंच होती. हे दोघे गायकवाड बंधूंकडून मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका पुढे एजंटकडे पाठवून पैसे उकळत होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे.
शिक्षक गुरुनाथ दत्तात्रय चौगले (रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी) हा सोळांकुर येथील कनिष्ट महाविद्यालयात नोकरी करतो. किरण साताप्पा बरकाळे (रा. ढेंगेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याची पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून निवड झाली आहे. अभिजित विष्णू पाटील (रा. बोरवडे, ता. कागल), रोहित पांडुरंग सावंत (रा. कासारपुतळे, ता. राधानगरी) दोघेही दूध साखर विद्यानिकेतन बिद्री, ता. कागल) येथे नोकरी करतात. पेपरफुटीतील त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने अटकेची कारवाई झाली. आता ते काम करीत असलेल्या शैक्षणिक संस्थांकडूनही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पेपर बाहेर आलाच?
अटकेतील गायकवाड टोळीकडून शनिवारी रात्री कोणालाही टीईटीचा पेपर मिळाला नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी रात्री काही परीक्षार्थींना पेपर मिळाला होता, अशी शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. ती टोळी वेगळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांना आणखी खोलात जाऊन चौकशी करावी लागणार आहे.
बेईमानीचे काम इमानदारीने
शिक्षक आणि ॲकॅडमी चालक टीईटीमध्ये पास करण्याची हमी देत होते. पास झाल्यानंतरच ते पैसे घेत होते. दगाफटका होऊ नये, यासाठी परीक्षार्थींची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली जात होती. टीईटी आणि सेट परीक्षेसह अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांनी असे बेईमानीचे काम इमानदारीने केल्याची चर्चा आहे.