Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा ‘भाजप’कडूनही अभ्यास; महायुतीच्या यशासाठी असाही एक फॉर्म्युला
By समीर देशपांडे | Updated: December 20, 2025 15:54 IST2025-12-20T15:52:28+5:302025-12-20T15:54:24+5:30
सविस्तर चर्चेनंतर निर्णय

Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा ‘भाजप’कडूनही अभ्यास; महायुतीच्या यशासाठी असाही एक फॉर्म्युला
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य, आरपीआयसह महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपने वेगळाच फॉर्म्युला आणला आहे. आपल्याच पक्षाच्या आणि पक्षाशी संबंधित प्रमुख नेत्यांना भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या नावांसह सर्वच्या सर्व ८१ जागांवर कोण उमेदवार असावेत याची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काहींनी त्यांच्या याद्या शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादरही केल्या आहेत.
यंदा पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभागाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे अनेकांचे पारंपरिक बालेकिल्ले अडचणीत आले आहेत. केवळ जुन्या एका प्रभागात मते घेऊन चालणार नाही तर उर्वरित तीन प्रमुख भागांमध्येही विजयासाठी मते मिळविण्याची गरज आहे. त्यामुळे जोडीला असणारे उमेदवारही तितकेच तोलामोलाचे आवश्यक आहेत.
जर मित्रपक्षांतील कोणीही उमेदवार देताना कार्यकर्त्याला संधी द्यायचीच म्हणून निवडून येण्याची क्षमता नसलेला उमेदवार दिला तर त्याचा फटका महायुतीच्या इतर उमेदवारांनाही बसू शकतो.
हाच विचार करून मंत्री पाटील यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील यांना वेगवेगळ्या याद्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार यातील काहींनी याद्या तयार करून मंत्री पाटील यांना प्रत्यक्ष भेटीत दिल्याही आहेत.
अनेकांकडून एकच नाव आले तर काम फत्ते
एखाद्या प्रभागातून भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे कोण कोण उमेदवार असावेत अशी चार नावे सर्वांनी दिली आहेत किंवा द्यायची आहेत. ती अभ्यास करून वास्तव समजून द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे या सर्वांच्या यादीत महायुतीमधील इच्छुकांची जर समान नावे असतील तर तो त्या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी साहजिकच सक्षम समजला जाईल, असा निष्कर्ष काढण्यास वाव आहे.
वेळेची बचत
सगळ्यांनी सगळ्या याद्या घेऊन काथ्याकूट करून वेळ घालवण्यापेक्षा अनेकांकडून ज्याच्या नावाला पसंती ते नाव निश्चित करून तो निर्णय लवकर घेता येईल. तसेच यातून बचत झालेला वेळ हा वादाच्या जागांवरील तिढा सोडवण्यासाठी वापरता येईल असा यामागील उद्देश आहे.
त्या पक्षाचे नेतेच घेणार निर्णय
जरी भाजपच्या यादीत कोणाचेही नाव असले तरी हे उमेदवार जिंकून येऊ शकतात असे सांगण्यापुरती ही नावे असतील परंतु ती नावे निश्चित करण्याचा अधिकार हा पूर्णपणे त्या-त्या पक्षाच्या प्रमुखांनाच राहणार आहे. भाजपकडून फक्त याबाबतीत वेळेची बचत आणि मजबूत उमेदवारांच्या नावांवर एकमत होण्यासाठी हा फॉर्म्युला असल्याचे सांगण्यात आले.