Kolhapur: 'करवीर' अपहारातील तिघांच्या घराची झडती, गुन्ह्यात एकूण ३४ आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:30 IST2025-12-26T17:29:17+5:302025-12-26T17:30:44+5:30
बँक खाती, मालमत्ता, पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रे जप्त

Kolhapur: 'करवीर' अपहारातील तिघांच्या घराची झडती, गुन्ह्यात एकूण ३४ आरोपी
कोल्हापूर : करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी (दि. २५) अटकेतील तीन आरोपींच्या कुरुकली (ता. करवीर) येथील घराची झडती घेतली. सुमित पांडुरंग परीट, सुयोग पांडुरंग परीट आणि शुभम एकनाथ परीट (तिघे रा. कुरुकली) अशी घर झडती झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या घरातून बँक खात्यांचे पासबुक, मालमत्तांची कागदपत्रे आणि पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली.
करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी दाखल झाला होता. याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास अधिकारी उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपासाची सूत्रे स्वीकारताच चार आरोपींना अटक केली आहे.
यातील सुमित परीट, सुयोग परीट आणि शुभम परीट यांच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान बँक खात्यांचे पासबुक, परीट कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या मालमत्तांची कागदपत्रे आणि पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. चौथा आरोपी ईर्षाद अल्लाबक्ष देसाई (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली असून, त्याच्याही घराची झडती घेतली जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
गुन्ह्यात एकूण ३४ आरोपी
या गुन्ह्यात एकूण ३४ आरोपी आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ३३ पैकी १४ आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. चौघांना अटक झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मालमत्तांचा शोध घेणार
अटकेतील आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे. आरोपींनी गेल्या वर्षभरात विकलेल्या मालमत्ता जप्त केल्या जातील, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच आरोपींच्या वादग्रस्त मालमत्तांची कोणीही खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जप्तीसाठी प्रस्ताव सादर होणार
एमपीआयडी कायदा १९९९ अंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. गुन्हा दाखल असलेल्या सर्व आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या तातडीने जप्त केल्या जातील. मंजुरीनंतर लिलाव प्रक्रियेने मालमत्तांची विक्री होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.