Ragging: कोल्हापूर जिल्ह्यातील अकॅडमी, शाळांच्या वसतिगृहांच्या तपासणीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:45 IST2025-10-14T12:44:31+5:302025-10-14T12:45:52+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश, तळसंदे येथील विद्यार्थ्यांना मारहाण घटनेचे परिणाम

संग्रहित छाया
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेच्या वसतिगृहातील घडलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि शाळांच्या वसतिगृहांची तपासणी करण्याचे सोमवारी आदेश दिले आहेत. या अकॅडमींवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे वृत्त सोमवारच्या अंकात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
तळसंदे येथील शाळेतील विद्यार्थ्यांकडून लहान विद्यार्थ्यांना बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी तातडीने या व्हिडीओची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना चौकशीचे आदेश दिले होते. सावंत यांनी सुमारे पाच तास त्या ठिकाणी कसून चौकशी करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले होते. तर वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवला होता.
वाचा - कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेठवडगावातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
या पार्श्वभूमीवर एकूणच जिल्ह्यातील अकॅडमींच्या कामकाजावर कोणाचे नियंत्रण नसल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘अकॅडमींचा वाढता प्रभाव, पण नियंत्रणाचा अभाव’ हे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत कार्तिकेयन यांनी याबाबत सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तपासणीमध्ये नेमकी काय तपासणी करायची आणि त्याची प्रपत्रेही तयार करण्यात आली. दिवसभर हे काम चालले होते. त्यानंतर सोमवारी रात्री कार्तिकेयन यांनी हे आदेश काढले.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी करावी
जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या पथकाच्या माध्यमातून अकॅडमी आणि त्यांची वसतिगृहे यांची तपासणी करावयाची आहे. तेथे सीसीटीव्हीची सोय आहे का इथपासून तिथल्या एकूणच कामकाजाची माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याची चेकलिस्टचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
मुले अकॅडमीत आहेत का याचीही तपासणी
नाव जिल्हा परिषदेच्या किंवा खासगी संस्थेच्या माध्यमिक शाळेत आणि विद्यार्थी अकॅडमीत आहे का याचीही खातरजमा करण्याचे लेखी आदेश देण्यात आले असून ३० नोव्हेंबरपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
अकॅडमींची पहिल्यांदाच अशी तपासणी
गेल्या २० वर्षांत जिल्ह्यात अकॅडमींची संख्या वाढली असून सुमारे सव्वाशे अकॅडमी आहेत. यातील अनेक जणांनी वरच्या इयत्तांच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. शासनाचे अनेक निकष या अकॅडमी पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत. भरमसाट फी, दुसऱ्या शाळेतील मुले प्रत्यक्षात अकॅडमीत असे अनेक प्रकार असून शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही यामध्ये भागीदारी आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही आमची चौकशी करू शकत नाही असे म्हणत संस्थेतही येऊ न देण्याची भूमिका काही अकॅडमींनी घेतली होती. परंतु तळसंदे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता या सर्व अकॅडमींची तपासणी होणार आहे.