दुचाकीस्वारांसाठी महत्वाची बातमी; ..अन्यथा हायवेवर होईल एक हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:23 IST2026-03-23T18:23:10+5:302026-03-23T18:23:21+5:30
अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई

दुचाकीस्वारांसाठी महत्वाची बातमी; ..अन्यथा हायवेवर होईल एक हजारांचा दंड
कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सात दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ अभियानाचे प्रबोधन आता संपले आले. आजपासून (सोमवार) राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करणार आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे. हेल्मेट नसलेल्यांना एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ प्रबोधनाची मोहीम आठवडाभर राबविली. त्यात १२०० वाहनांची तपासणी झाली असून ४३५ वाहनधारकांनी हेल्मेट घातले नसल्याचे निदर्शनास आले. ‘हेल्मेट वापरा, जीवन वाचवा’ असा संदेश देऊन मोहिमेत हेल्मेट परिधान केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर हेल्मेट नसलेल्यांचे मी हेल्मेट वापरणार, अशा आशयाचा फलक त्यांच्या हाती देऊन छायाचित्र घेऊन प्रबोधन केले.
आता ही प्रबोधन मोहीम थांबणार असून हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरील दोघांनाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.
हेल्मेट सक्ती का?
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जात आहे.
पहिल्या टप्प्यात किणी टोल नाका
कारवाईसाठी पहिल्या टप्प्यात किणी टोल नाका येथे प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर कागल येथील आरटीओ तपासणी नाका येथे कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. त्या ठिकाणी दोन मोटारवाहन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
रडार यंत्रणेची वैशिष्ट्ये
- इंटरसेप्टर वाहनांत रडार यंत्रणा, वाय- फाय, एनपीआर कॅमेरा.
- एनपीआर, कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाने रात्रीच्या वेळेसही प्रभावी कारवाई.
- अधिकाऱ्यांना कारवाईसाठी एक विशिष्ट क्षेत्र निश्चित करावे लागणार.
- रडार प्रणालीद्वारे वाहनांच्या हालचालींवर स्वयंचलित पद्धतीने नजर.
- नियमभंग वाहनचालकांवर ऑटोमॅटिक दंड.
आठ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी इंटरसेप्टर वाहने कोल्हापूर परिवहन कार्यालयाला मिळाली.
- यावर अत्याधुनिक रडार यंत्रणा २ बसविली आहे. यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण आठ मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांना दिले आहे.
दोन अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई होईल. हेल्मेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंडाची पावती केली जाईल. हा दंड भरला नसल्यास परिवहन विभागाकडील त्या वाहनधारकांचे कोणतेही काम होणार नाही. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी