संमतीपत्राच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर याद राखा; स्वाभिमानीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 21:05 IST2020-09-28T17:38:58+5:302020-09-28T21:05:14+5:30
कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून समंती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर याद स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

एफआरपीचे तुकडे करण्यासाठी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेतली आहेत. ती बेकायदेशीर असून अशा प्रकारे एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीचे निवेदन सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांना देण्यात आले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर शंभूशेट्टे आदी उपस्थित होते. (छाया- नसीर अत्तार)
कोल्हापूर: कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून संमती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून संमती पत्रे घेऊन एफआरपी दोन-तीन टप्यात सप्टेंबरपर्यंत देण्यासाठी कायद्याने बांधून घेतले आहे. त्याबाबत सोमवारी लोकमतने वस्तूस्थिती मांडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून त्याचा जाब विचारण्यासाठी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांची भेट घेऊन संमती पत्राच्या आडून एफआरपीचे तुकडे पाडू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
सागर शंभूशेट्टे म्हणाले, वारणा कारखान्याने मागील एफआरपी दिली नसताना गेल्या वर्षी गाळप परवाना दिला कसा? शेतकऱ्यांनाच तेवढे कायदा आणि कारखानदार मोकाट फिरणार असतील तर याद राखा, गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशारा वैभव कांबळे व रंगराव पाटील यांनी दिला. याच दरम्यान, सागर शंभूशेट्टे यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने वातावरण तणावपुर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले.
यावर, जबरदस्तीने कोणाला समंती पत्रे घेता येणार नाहीत. असे कोण करत असेल व नोंद किंवा ऊस तोडीबाबत अडवणूक करत असेल तर साखर सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांनी सांगितले. यावेळी साखर उपसंचालक एस. एन. जाधव, सहकार श्रेणी अधिकारी-१ रमेश बारडे उपस्थित होते.