US-Israel-Iran war: मिसाईलचा आवाज ऐकला अन् पोटात धडकीच भरली; दुबईत अडकलेल्या कोल्हापूरकरांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:47 IST2026-03-03T16:46:27+5:302026-03-03T16:47:44+5:30

सर्वजण सुरक्षित असल्याचा निर्वाळा

I heard the sound of a missile and felt a pang in my stomach The tragedy of Kolhapur residents stranded in Dubai | US-Israel-Iran war: मिसाईलचा आवाज ऐकला अन् पोटात धडकीच भरली; दुबईत अडकलेल्या कोल्हापूरकरांची आपबीती

संग्रहित छाया

कोल्हापूर : अमेरिकन एअर बेस स्टेशनवर टाकण्यात आलेल्या मिसाईलचे आवाज स्वत:च्या कानांनी ऐकले आणि पोटात धडकी भरली. आता पुढच्या क्षणी काय होईल याची मनाला सतत धास्ती लागून राहिली आहे. आज आम्ही सुरक्षित असलो, सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत असलो तरी उद्या काय होणार आहे याची कल्पना नाही, असे कोल्हापूरहून दुबईला नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या अनेक व्यक्तींनी ‘लोकमत’ला सांगितले.

अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात शनिवारपासून युद्ध सुरू झाल्याने या युद्धाचा फटका संयुक्त अरब अमिरात अंतर्गत तेथील शहरांना बसला आहे. अमेरिकेने इराणवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर इराणने देखील अमेरिकेला चोख उत्तर दिले आहे. आबुधाबीपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेच्या एअरबेस स्टेशनवर मिसाईल सोडली आहेत. त्यामुळे दुबईत देखील हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर टी.व्ही. वरील बातम्या पाहून आखाती देशात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर परिसरातील गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भीतीने गाळण उडाली आहे.

स्थानिक प्रशासनाने या हल्ल्यांची दखल घेऊन सर्व नागरिकांसाठी हाय अलर्ट जाहीर केला असून कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या आहेत. स्थानिक शाळाही चार दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर परिसरातील नागरिकांनी या सूचनांचे पालन केले असून घरातून बाहेर पडण्याचे टाळले आहे.

अमेरिकन एअरबेस स्टेशनवर हल्ले झाल्यानंतर स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर परिसरातील त्याचबरोबर मराठी माणूस एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकमेकांना आधार देत आहेत. सध्या शहरी भागात कोणतीही घटना घडली नसली तरी पुढच्या क्षणी काय होईल याची कोणालाच कल्पना नसल्याने सर्वांच्याच मनात भीती आहे. तेथे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे.

गुडाळ (ता. राधानगरी) येथून नोकरीच्या निमित्ताने आबुधाबी येथे वास्तव्यास असणारे स्थापत्य अभियंता पीयूष पाटील यांनी सांगितले की, ‘शनिवारी आबुधाबीपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन एअर बेस स्टेशनवर झालेल्या मिसाईल हल्ल्याचा आवाज आम्ही ऐकला. काही जणांनी मिसाईल पडताना पाहिले. त्यामुळे पुढच्या क्षणापासून आता काय होणार अशी मनात भीती आहे. आम्ही सर्व महाराष्ट्रीयन एकमेकांशी मोबाईलवर संपर्क साधून आहोत. सध्या तरी एकमेकांना आधार देणे आणि घरातच बसून राहणे सर्वांनी पसंद केले आहे.

भीतीचे वातावरण

कोल्हापुरातील आरिश व आर्शिल मुजावर हे दोघे बंधू नोकरी निमित्ताने कतारमध्ये वास्तव्य करत आहेत, आरिश यांच्या पत्नी आयेशा मुजावर व सहा महिन्याची कन्या आयत सोबत वास्तव्य करत आहेत. इराणकडून दिवसभर जोरदार मिसाईल हल्ले सुरू झाले आणि कतारमध्ये भीतीचे वातावरण पसरले असे त्यांनी सांगितले. कामाला सुरुवात होणार इतक्यात इराणच्या हल्ल्याने काही ठिकाणी धमाके झाले आणि सर्वांना आपापल्या घरी जाण्याच्या सूचना दिल्या. सरकार सांगत नाही तोपर्यंत कोणीही घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वजण सुरक्षित असल्याचा निर्वाळा

कोल्हापूर जिल्ह्यातील ४० ते ५० जण कतारमध्ये नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करत आहेत. मात्र सर्वजण सुरक्षित आहेत असे या सर्वांनी त्यांच्या कुटुंबाना कळवले आहे. भारतीय दूतावास सुद्धा सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. भारतीय दूतावासाकडून कतारमधील भारतीयांना एक मोबाईल क्रमांक इमर्जन्सीमध्ये देण्यात आला आहे, कोणत्याही अडचणीत तत्काळ संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title : US-इजराइल-ईरान युद्ध: दुबई में फंसे कोल्हापुर वासियों ने सुनाई आपबीती।

Web Summary : दुबई में कोल्हापुर के निवासियों ने अमेरिकी एयरबेस के पास मिसाइल हमले की आवाज सुनकर डर व्यक्त किया। हाई अलर्ट घोषित, स्कूल बंद। घर पर परिवार चिंतित। सभी घर के अंदर, अपडेट का इंतजार कर रहे हैं।

Web Title : US-Israel-Iran War: Kolhapur residents stuck in Dubai recount their ordeal.

Web Summary : Kolhapur residents in Dubai recount fear after hearing missile strikes near US airbase. High alert declared; schools closed. Families worried back home. Everyone stays indoors, awaiting updates, connected via phone.