Kolhapur Crime: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:32 IST2026-02-18T12:31:30+5:302026-02-18T12:32:01+5:30

निर्दयपणे गळा दाबल्याने घशाला गंभीर दुखापत. स्वरयंत्र खराब झाल्याने त्यांचा आवाज फुटत नव्हता.

Husband confesses to killing wife out of anger over being questioned about immoral relationship Incident in Shaniwar Peth Kolhapur | Kolhapur Crime: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुली

Kolhapur Crime: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुली

कोल्हापूर : इतर महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधांचा जाब विचारल्याच्या रागातून सात फेब्रुवारीला पत्नीचा गळा दाबून मारहाण केल्याची कबुली गणेश शंकर हुबाळे (वय ४०, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) याने पोलिसांकडे दिली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या स्वाती (३४) यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. १६) दुपारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश याला अटक केली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि स्वाती यांचा १६ ऑगस्ट २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. गणेश याचा बिंदू चौकात कोल्हापुरी फेटे विक्रीचा व्यवसाय आहे. या दाम्पत्याला १२ वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षीय मुलगा आहे. सुरुवातीची काही वर्षे त्यांचा संसार आनंदाने सुरू होता. गेल्या पाच-सहा वर्षांपासून गणेश याच्या अनैतिक संबंधांमुळे कुटुंबात वादाचे खटके उडत होते. सात फेब्रुवारीला स्वाती यांनी याबाबत पतीला विचारणा केली. गळ्यातील सोन्याची चेन आणि आंबेवाडी (ता. करवीर) येथील प्लॉटचे काय केले, असा जाब विचारला. या रागातून त्याने पत्नीचा गळा दाबून हाताने मारहाण केली. 

त्यानेच गंभीर अवस्थेत पत्नीला कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी (दि. १६) दुपारी स्वाती यांचा मृत्यू झाला. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याने पतीला अटक करावी, असा आग्रह स्वाती यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी धरला होता. स्वाती यांचा भाऊ प्रवीण दगडू भाट (३७, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) यांच्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

वाचा: मुलांना डोळ्यात साठवत डोळे मिटले..आई-बापाच्या वादात मुलं झाली पोरकी; हुबाळे कुटुंबाची शोकांतिका

पळून जाण्यापूर्वीच अटक

अटकेच्या भीतीने आरोपी गणेश हा पळून जाण्याच्या तयारीत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यरात्रीच त्याला करवीर पंचायत समिती कार्यालयाजवळ अटक केली. अधिक चौकशीत त्याने पत्नीचा गळा दाबून मारहाण केल्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

माहेरच्या नातेवाइकांकडून अंत्यसंस्कार

पोलिसांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा स्वाती यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला. त्यांनीच पंचगंगा स्मशान घाट येथे अंत्यसंस्कार केले. दोन्ही कुटुंबांत वाद होऊ नये यासाठी पोलिस उपस्थित होते. या घटनेमुळे शनिवार पेठेसह राजोपाध्येनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जबाबही नोंदवता आला नाही

निर्दयपणे गळा दाबल्याने स्वाती यांच्या घशाला गंभीर दुखापत झाली होती. श्वास घेणेही शक्य होत नव्हते. स्वरयंत्र खराब झाल्याने त्यांचा आवाज फुटत नव्हता. त्यामुळे पोलिसांना जबाब नोंदविता आला नाही, अशी माहिती स्वाती यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी दिली.

अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ मिळाला

गणेश हुबाळे हा त्याच्या फेट्यांच्या दुकानात तरुणींशी अश्लील चाळे करीत होता. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या चाळ्यांचे चित्रीकरण झाले होते. यातील एक व्हिडिओ त्याच्या पत्नीच्या हाती लागला. पुराव्यांसह तिने जाब विचारताच त्याने वादाला सुरुवात केली.

Web Title: Husband confesses to killing wife out of anger over being questioned about immoral relationship Incident in Shaniwar Peth Kolhapur