Kolhapur- कुणाकडे ८० लाखांचा बंगला, तर कुणाकडे १४ फ्लॅट; एएस ट्रेडर्समधून एजंटच झाले गब्बर 

By उद्धव गोडसे | Updated: September 4, 2023 16:13 IST2023-09-04T16:11:14+5:302023-09-04T16:13:26+5:30

चौकशीचा ससेमिरा लागताच सीएकडे धाव

Hundreds of agents of AS Traders Company earned lakhs of rupees in kolhapur | Kolhapur- कुणाकडे ८० लाखांचा बंगला, तर कुणाकडे १४ फ्लॅट; एएस ट्रेडर्समधून एजंटच झाले गब्बर 

Kolhapur- कुणाकडे ८० लाखांचा बंगला, तर कुणाकडे १४ फ्लॅट; एएस ट्रेडर्समधून एजंटच झाले गब्बर 

उद्धव गोडसे

कोल्हापूर : गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचे शेकडो एजंट मालामाल झाले आहेत. पोलिसांच्या तपासात संचालकांसह आता एजंटही रडारवर आले आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांवर गब्बर झालेल्या एजंटनी चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी सीएंकडे धाव घेतली आहे, तर अनेकांनी त्यांच्या नावावरील मालमत्ता लपवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

एएस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालकांवर गुन्हे दाखल होताच संशयित संचालक पोलिसांच्या रडारवर आले. सुरुवातीला संचालकांभोवतीच तपास केंद्रीत झाल्याने एजंट नामानिराळे होते. गुंतवणूकदारांनी परतावे आणि मुद्दल परत देण्याचा तगादा लावल्यानंतर एजंटनी कंपनी बंद असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना उडवून लावले. मात्र, पोलिसांच्या तपासात आता एजंटही रडारवर आले आहेत. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा सुरू होताच एजंट बचावासाठी पळापळ करीत आहेत. त्यांच्या मालमत्ता पाहून पोलिसांचेही डोळे चक्रावले.

कंपनीच्या प्रमुख एजंटपैकी एक एजंट फुलेवाडी येथील रिंगरोडला राहतो. त्याचा सुमारे ७५ लाखांचा प्रशस्त बंगला आहे. राधानगरी तालुक्यातील एक एजंट शहरात जिवबानाना पार्क येथे राहतो. खासगी ट्रॅव्हल्सचा कमिशन एजंट ते एएस ट्रेडर्सचा कमिशन एजंट असा त्याचा प्रवास आहे. त्याच्याकडे आलिशान कार आहेत. संचालक बाबूराव हजारे याच्याकडे एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलेला दरमहा सहा लाख रुपये कमिशन मिळत होते. पैसा मिळताच तिने पतीपासून घटस्फोट घेतला.

कर सल्लागाराची कमाल

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील एक कर सल्लागार एएसमध्ये एजंट म्हणून काम करीत होता. त्याचा शहरात ८० लाखांचा बंगला आहे. सुमारे १,३०० गुंतवणूकदारांचे पैसे त्याने एएसमध्ये जमा केले. सोलापूर जिल्ह्यात त्याची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.

करवीर तालुक्यात सर्वाधिक एजंट

संचालक विजय पाटील याच्याकडे अनेक एजंट पैसे जमा करीत होते. त्यापैकी म्हारूळ येथील एका एजंटकडे आलिशान कार आहेत. फुलेवाडी रिंगरोड येथे त्याचा प्रशस्त बंगला आहे. त्याच गावातील आणखी एका एजंटचा शहरात प्रशस्त बंगला आहे.

गांधीनगरमधील एजंटवर कारवाईची मागणी

गांधीनगर येथे फ्रँचायजी सुरू केलेल्या एका एजंटला कंपनीच्या माध्यमातून पाच गाड्या आणि १४ फ्लॅट मिळाल्याची चर्चा आहे. त्याने इतरांचे लाखो रुपये स्वत:च्या नावावर गुंतवले आहेत. त्याचा तपास होऊन कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदार करीत आहेत.

Web Title: Hundreds of agents of AS Traders Company earned lakhs of rupees in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.