कोल्हापुरात कडकडीत ऊन; पाण्याखाली गेलेले ११ बंधारे खुले, धरण क्षेत्रातही पाऊस झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:56 IST2025-07-12T11:54:58+5:302025-07-12T11:56:45+5:30
धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी झपाट्याने कमी

कोल्हापुरात कडकडीत ऊन; पाण्याखाली गेलेले ११ बंधारे खुले, धरण क्षेत्रातही पाऊस झाला कमी
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. दिवसभरात विविध नद्यांवरील ११ बंधारे मोकळे झाले असून, अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे. गुरुवारी दिवसभर उघडीप राहिली. शुक्रवारी गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी सकाळपासूनच ऊन राहिले. बऱ्याच दिवसांनी पूर्ण दिवसभर आकाश मोकळे दिसत होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.७ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १५.२ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, वारणातून ४५००, तर दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अंग भाजणारे ऊन..
शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान २४, तर कमाल २९ डिग्रीपर्यंत राहिले. किमान तापमान वाढल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता. त्यामुळे सकाळी दहा वाजताच अंग भाजून निघत होते.
रोप लागणींची धांदल
मध्यंतरीच्या एकसारख्या पावसाने भात, नागलीची रोप लागण थांबली होती. गेल्या आठ दिवसांपासून उघडझाप सुरू असल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात रोप लागणीची धांदल उडाली आहे.