कोल्हापूरच्या हद्दवाढीनंतर निवडणूक घ्या, कृती समितीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:00 IST2025-01-25T16:59:42+5:302025-01-25T17:00:05+5:30

महापालिकेत बैठक, प्रसंगी ‘कोल्हापूर बंद’चा इशारा

Hold elections after Kolhapur delimitation, demands action committee | कोल्हापूरच्या हद्दवाढीनंतर निवडणूक घ्या, कृती समितीची मागणी 

कोल्हापूरच्या हद्दवाढीनंतर निवडणूक घ्या, कृती समितीची मागणी 

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ आता आता नाही तर कधीच होणार नाही. यामुळे हद्दवाढीच्या समर्थनात लढा तीव्र करू, हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक नको, हद्दवाढीसाठी वेळप्रसंगी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देऊ, असा इशारा शहर व जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे देण्यात आला. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेत शुक्रवारी झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोवार म्हणाले, वर्ष १९७२ पासून हद्दवाढीची मागणी करीत आहोत. मात्र, शासन निर्णय घेत नाही. एका माजी मंत्र्याच्या सांगण्यावरून ग्रामीण विभागाशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण संवाद साधताना आम्हाला वाईट अनुभव आले. कोल्हापूरनंतर सांगली, मिरज, कुपवाड महापालिका झाली. इचलकंरजी महापालिका झाली. राज्यातील इतर शहरांची हद्दवाढ वेळोवेळी झाली; पण कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढ नसल्याने आपण मागे राहिलो.

ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, शहराचे क्षेत्रफळ अनेक वर्षांपासून ६६.८२ चौरस किलोमीटर इतकेच आहेत. कमी जागेत अधिक लोकसंख्या राहत आहे. वाहने वाढली आहेत. रस्ते वाढले आहेत. शास्त्रीय माहितीचा आधार घेऊन राज्य शासनाकडे हद्दवाढ करावी. आंदोलकांच्या मागणीनुसार गेल्या ५३ वर्षांत महापालिका प्रशासनाने केवळ ६ वेळा हद्दवाढीबाबत पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हद्दवाढ झालेली नाही.

बाबा पार्टे म्हणाले, हद्दवाढीचा विरोध ऐकू नका. हद्दवाढ ही आता काळाची गरज आहे. कोल्हापुरात राहून काही नेते हद्दवाढीला विरोध करतात. आम्ही जनता म्हणून हद्दवाढ करण्यासाठी लढत राहू.

किशोर घाटगे म्हणाले, लगतच्या अनेक भागांमध्ये महापालिकेच्या पाइपलाइनवर अनेक बोगस नळ कनेक्शन आहेत. ह नळ कनेक्शन तोडायला हवीत. यावेळी अशोक भंडारे, अनिल कदम, राहुल चव्हाण, भाजपचे महेश जाधव, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Hold elections after Kolhapur delimitation, demands action committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.