Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:05 IST2025-09-27T12:05:10+5:302025-09-27T12:05:36+5:30

ज्येष्ठ व लहान मुले हरवली, पावसामुळे नंतर संख्या रोडावली

Highest crowd of devotees at Ambabai Temple Kolhapur, stampede near Manikarnika Kunda-video | Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video

Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला शुक्रवारी काेल्हापुरातील श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी उच्चांकी गर्दी केली. यावर्षी प्रथमच दर्शन रांगा शेतकरी बझारमधील मंडपापर्यंत गेल्या. पहाटेपासूनच मुख्य दर्शन रांगेसह मुखदर्शनाच्या रांगा ओसंडून वाहत होत्या. मणिकर्णिका कुंडाजवळील मुखदर्शन रांग आणि बाहेर पडणारे भाविक एकत्रच आल्याने तिथे मोठी चेंगराचेंगरी झाली. यंदा प्रथमच गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिस, देवस्थान आणि स्वयंसेवकांचा कस लागला. रात्री ८ वाजेपर्यंत २ लाख २३ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मात्र पावसामुळे गर्दी ओसरली.

यंदा प्रथमच भाविकांच्या रांगा पूर्व दरवाज्यातील रांगा, जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोरील रांगा भरून पुढे शेतकरी बझारमधील दर्शन मंडपात गेल्या. दिवसभर गर्दीचा ओघ सुरूच होता. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना महाद्वारातून बाहेर पाठवण्यासाठी येथे बॅरिकेट्स लावण्यात आले. नजर जाईल तिकडे फक्त गर्दीच दिसत होती. मंदिराच्या चारही दरवाज्यांतून भाविकांचे लोंढेच्या लोंढे मंदिरात येत होते.

चेंगराचेंगरीने घुसमट

शुक्रवारी दुपारी १२ वाजता अंबाबाई मंदिरात मुख्य दर्शन रांग वगळता अन्य तीन प्रवेशद्वारांतून भाविक मुख दर्शनासाठी येत होते. हा ओघ प्रचंड होता. त्यात दर्शन घेऊन बाहेर पडणारे भाविक आणि घाटी दरवाज्यातून आत येऊन गणपती चौकातील मुखदर्शनासाठी येणारे भाविक मणिकर्णिका कुंडाजवळ एकत्र आले. हा भाग अतिशय चिंचोळा असल्याने मुखदर्शन रांगेतील आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. गर्दी झाल्याने भाविकांची घुसमट झाली. अखेर देवस्थानने स्वयंसेवकांच्या हातात दोरीत धरून साखळी करून गर्दीवर नियंत्रण मिळवले.

ज्येष्ठ व लहान मुले हरवली

शुक्रवारच्या प्रचंड गर्दीमुळे ज्येष्ठ भाविक व लहान मुले मोठ्या प्रमाणात हरवली. हरवलेल्यांचे नातेवाईक पोलिस मदत कक्ष, अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, शेतकरी बझारमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत होते. माईकवर त्यांचे नाव जाहीर केल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने हरवलेल्यांना नातेवाईकांकडे सोपवले जात होते.

तासाला २२ हजार भाविक

एआयच्या नोंदीनुसार, पहाटे साडेतीन वाजल्यापासून दर्शन रांगा सुरू झाल्या. सकाळी ६ ते ९ या वेळेत तासाला २२ हजार भाविक मंदिरात जात होते. ९ ते १२ या वेळेत तासाला ११ ते १४ हजार भाविक मंदिरात जात होते. दुपारी ३ वाजेपर्यंत गर्दीचा हा ओघ कायम राहिला. त्यानंतर मात्र पावसामुळे गर्दी अगदीच रोडावली.

वाहतूक कोंडी

मंदिरालगतचा महाद्वार रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताराबाई रोड, खरी कॉर्नर यासह मंदिरालगतच्या सर्व मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

Web Title : कोल्हापुर अंबाबाई मंदिर में रिकॉर्ड भीड़, मणिकर्णिका कुंड के पास भगदड़

Web Summary : नवरात्रि में कोल्हापुर के अंबाबाई मंदिर में रिकॉर्ड भीड़ उमड़ी। मणिकर्णिका कुंड के पास अत्यधिक भीड़ के कारण भगदड़ मच गई। 2.23 लाख से अधिक भक्तों ने दर्शन किए। यातायात बाधित।

Web Title : Kolhapur Ambabai Temple Sees Record Crowd, Stampede Near Manikarnika Kund

Web Summary : Record crowds thronged Kolhapur's Ambabai temple during Navratri. A stampede occurred near Manikarnika Kund due to overcrowding. Over 2.23 lakh devotees visited. Traffic disrupted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.